आयएसएल बंद झाल्याने सुनील छेत्री चिंतेत

इंडियन सुपर लीग (आयएसएल) थांबवण्यात आल्याने हिंदुस्थानी फुटबॉल संघाचा माजी कर्णधार सुनील छेत्री याने चिंता व्यक्त केली आहे. ‘सध्याची परिस्थिती हिंदुस्थानी फुटबॉलसाठी अत्यंत त्रासदायक आहे. संबंधित खेळाडू, प्रशिक्षक, वैद्यकीय कर्मचारी व इतर सगळेच या घटनेमुळे घाबरलेले आणि निराश झाले आहेत,’ अशी प्रतिक्रियाही त्याने दिली.

आयएसएलमध्ये बंगळुरू एफसीकडून खेळणाऱ्या सुनील छेत्रीने सोशल मीडियावर लिहिताना सांगितले की, ‘देशभरातून अनेक खेळाडू आणि स्टाफकडून त्यांना फोन व मेसेज येत आहेत. या सर्वांकडून भविष्याबाबत भीती व्यक्त केली जात आहे. हे फक्त त्यांचं वैयक्तिक संकट नाही, तर संपूर्ण हिंदुस्थानी फुटबॉल क्षेत्रासाठी हा चिंतेचा विषय असल्याचेही त्याने स्पष्ट केले.

आयएसएलचा 2025-26 हंगाम स्थगित करण्यात आला आहे. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन (एआयएफएफ) आणि स्पर्धा आयोजक कंपनी फुटबॉल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट लिमिटेड (एफएसडीएल) यांच्यात मास्टर राईट्स अॅग्रीमेंटचे (एमआरए) नूतनीकरण अद्याप झालेले नाही. सर्वोच्च न्यायालयाने एआयएफएफला आदेश दिला आहे की, एआयएफएफवर अंतिम निर्णय होईपर्यंत एफएसडीएलसोबत कोणताही नवीन करार करू नये.