
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलनंतर हिंदुस्थानी संघ इंग्लंडबरोबर पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत हिंदुस्थान विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली इंग्लंडला 4-0 अशा फरकाने धूळ चारेल, असा विश्वास हिंदुस्थानचे माजी महान फलंदाज सुनील गावसकर यांनी व्यक्त केला आहे.
एका वृत्त संस्थेशी बोलताना सुनील गावसकर यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानी संघ नुकताच इंग्लंडमध्ये पोहचला आहे. इंग्लंड दौऱयादरम्यान हिंदुस्थानी संघ प्रथम 18 ते 22 जून या कालावधीत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडशी दोन हात करणार आहे. हा महत्त्वाचा सामना झाल्यानंतर हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. मुलाखतीदरम्यान सुनील गावसकर म्हणाले, हिंदुस्थान आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 18 जून ते 22 जून दरम्यान होणार आहे. हा सामना झाल्यानंतर जवळपास चार ते पाच आठवडय़ांनी हिंदुस्थान इंग्लंडविरुद्धची मालिका खेळणार आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याच्या निकालाचा कोणताही परिणाम हिंदुस्थानी संघावर होणार नाही. नव्या उमेदीने उतरणारा हिंदुस्थानी संघ कोणत्याही दडपणाशिवाय इंग्लंडविरुद्ध खेळेल. हिंदुस्थानी संघातले सगळे खेळाडू सध्या फॉर्मात आहेत. त्यामुळे आगामी मालिकेत हिंदुस्थान इंग्लंडला 4-0 अशा फरकाने हरवेल.
पानेसरची भविष्यवाणी
हिंदुस्थानी संघ योग्य वेळी इंग्लंडचा दौरा करत असल्याने इंग्लंडविरुद्ध ते आत्मविश्वासाने मैदानात उतरतील. ऑगस्ट महिन्यात इंग्लंडमधील वातावरण उष्ण असते. याचाच फायदा हिंदुस्थानी संघ घेऊ शकतो. संघात दोन फिरकीपटूंना संधी देऊन इंग्लंडला पाच सामन्यांच्या मालिकेत 5-0 म्हणजेच क्लीन स्वीप देण्याची धमक हिंदुस्थानी संघात आहे, अशी भविष्यवाणी इंग्लंडचा माजी फिरकीपटू माँटी पानेसरने प्रथमतः केली होती.




























































