
जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्लूटीसी) स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीमुळे निराश झालेल्या सुनील गावसकरांनी आज थेट कर्णधार रोहित शर्मावर आपले शाब्दिक बाण सोडले. रोहितकडून खूप अपेक्षा होत्या, पण त्याने अपेक्षाभंगच केला आहे. तो नेतृत्वाच्या कसोटीवर अपयशी ठरला आहे. आयपीएलचा इतका प्रभावी आणि जबरदस्त अनुभव असतानाही हा दिग्गज कर्णधार म्हणून प्रभावहीनच ठरल्याची टीका त्यांनी केली.
एका कार्यक्रमात गावसकरांनी टीम इंडियाच्या नेतृत्वावर जोरदार टीका केली. मी रोहितकडून अपेक्षेपेक्षा अधिक अपेक्षा केली होती. मायभूमीत तो चमकला हे ठीक आहे, पण परदेशातील खेळपट्टय़ांवर त्याची खरी कसोटी होती. तिथे तो उताणा पडला. तोंडावर आपटला. 100 पेक्षा अधिक सामन्यांमध्ये नेतृत्व आणि आयपीएलचे पाच-पाच वेळा जेतेपद पटकावणारा हिटमॅन आपल्या नेतृत्वात हिंदुस्थानी संघाला एकदाही टी-20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत पोहोचवू शकलेला नाही. ही बाब फारच निराशाजनक असल्याचे गावसकर म्हणाले. तीच कामगिरी डब्लूटीसीच्या फायनलमध्येही घडली.
रोहित–द्रविडला जाब विचारा
डब्लूटीसीच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना जाब विचारायला हवा. तुम्ही नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय का घेतला? नाणेफेकीच्या वेळी सांगितले होते की, ढगाळ वातावरण होते म्हणून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले. मग पुढचा प्रश्न विचारायला हवा, ट्रव्हिस हेड बाऊन्सरला घाबरतो, तर त्याला बाऊन्सर का टाकले नाही? तो 80 धावांवर पोहोचला तेव्हा का बाऊन्सरचा मारा केला? कॉमेंट्री बॉक्समध्ये खुद्द रिकी पॉण्टिंगने हेडसमोर बाऊन्सर टाका, असा सल्ला दिला होता. आपल्या पूर्ण संघाला याची कल्पना होती, तरी त्याला बाऊन्सर का टाकले नाहीत याची माहिती सर्वांसमोर यायला हवी.
तो क्षण आठवताच डोळे पाणावतात
1983 चे जगज्जेतेपद हा माझ्या क्रिकेट कारकीर्दीतील सर्वोच्च क्षण आहे. जेव्हा कपिल देवने जगज्जेतेपदाचा चषक उंचावला, तो क्षण आजही आठवला तरी डोळे पाणावतात. क्रिकेटमध्ये तुम्ही काहीही करू शकता; पण विशेषकरून तेव्हा जेव्हा तुमचा संघ, तुमचा देश त्या सर्वोच्च उंचीवर पोहोचतो, तेव्हा जो आनंद मिळतो त्याची तुम्ही मोजदादही करू शकत नसल्याचे गावसकर म्हणाले.
































































