टी-20 मध्ये एका षटकात दोन बाऊन्सर टाकण्याची मुभा द्यायला हवी, गावसकरांची गोलंदाजांसाठी ‘बॅटिंग’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आकाराने लहान स्टेडियम… पाटा खेळपट्टी… अन् क्रिकेटप्रेमींना आकर्षित करण्यासाठी तयार करण्यात आलेले काही नवे नियम… या पार्श्वभूमीवर टी-20 क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पडतोय. फलंदाज गोलंदाजांवर वर्चस्व गाजवताहेत. याचे उत्तम उदाहरण यूएईत सुरू असलेल्या आयपीएलमध्ये बघायला मिळत आहे. याचप्रसंगी हिंदुस्थानचे महान फलंदाज सुनील गावसकर यांनी गोलंदाजांसाठी ‘बॅटिंग’ केली आहे. त्यांनी आयसीसीला सूचना करताना सांगितले की, टी-20 क्रिकेटमध्ये एका षटकात दोन बाऊन्सर टाकण्याची मुभा गोलंदाजांना द्यायला हवी. सुनील गावसकर पुढे म्हणाले, टी-20 क्रिकेट उत्तम प्रकारे सुरू आहे. पण स्टेडियमच्या व्यवस्थापनाकडून परवानगी मिळाल्यास थोडे मोठे ग्राऊंड करता येऊ शकते. तसेच एखाद्या गोलंदाजाने पहिल्या तीन षटकांत विकेट घेतली असेल तर त्याला जादा षटक टाकण्याची मुभा द्यायला हवी.

टीव्ही अंपायरने याकडे लक्ष द्यावे
गोलंदाजाने रेषेच्या पुढे पाय टाकला की नाही याची जबाबदारी आता टीव्ही अंपायरकडे देण्यात आली आहे. अर्थात नो बॉलकडे त्यांचे लक्ष असते. आता गोलंदाजाने चेंडू टाकण्याआधी नॉन स्ट्रायकर एंडवर उभा फलंदाज क्रीझ सोडून पुढे आला की नाही हेदेखील टीव्ही अंपायरने बघायला हवे. तो पुढे आला असेल तर एक शॉर्ट रन द्यावी. त्या चेंडूवर चौकार किंवा षटकार मारला गेला असेल तर टीव्ही अंपायरकडून दंड ठोठावण्यात यावा, असे सुनील गावसकर यांना वाटते.

हा तर विनू मंकड यांचा अवमान
नॉन स्ट्रायकर फलंदाजाने चेंडू टाकण्याआधी क्रीझ सोडल्यानंतर गोलंदाजाकडून त्याला धावचीत बाद करण्यात आल्यास ‘मांकडिंग’ असे संबोधले जाते. हा तर हिंदुस्थानचे महान क्रिकेटपटू विनू मंकड यांचा अवमान आहे, असे स्पष्ट अन् परखड मत सुनील गावसकर यांनी व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले, 1948 साली हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये कसोटी सामना रंगला. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या बिल ब्राऊन यांना विनू मंकड यांनी क्रीझ सोडल्यानंतर बाद केले. सर डॉन ब्रॅडमन यांनीही नियमानुसार विनू मंकड यांनी योग्य ते केले असे सांगितले. तरीही आताच्या काळात ‘मांकडिंग’ म्हणून या घटनेला संबोधले जाते. हे चुकीचे आहे, असे त्यांनी पुढे सांगितले.