भीती न बाळगता कोरोनावरील लस घ्या – पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार

कोविड प्रतिबंधासाठी लस घेतल्याने कोणताही त्रास होत नाही. कसलीही भीती न बाळगता लस घ्या व लसीकरण मोहिमेस सहकार्य करा, असे आवाहन पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी केले आहे. त्यांनी कोविड लसीचा दुसरा डोस शहरातील मेडिकल कॉलेज लसीकरण केंद्रात घेतला. त्यांच्यासह अनुजा केदार यांनीही लस घेतली. केदार यांनी यापूर्वी लसीचा पहिला डोस घेतला आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यावेळी उपस्थित होते.

दूरगामी परिणामापासून वाचायचे असेल तर लसीकरण नक्कीच करा. स्वयंप्रेरणेने लसीकरण करुन दुसऱ्याला प्रेरित करा. कोरोना महामारीवर मात करण्यासाठी लसीकरण हा एकमेव प्रभावी उपाय आहे, असे केदार यांनी यावेळी सांगितले. शासनाने केलेल्या वेगवेगळया उपाययोजना, निर्बंध व नियमांचे तंतोतंत पालन नागरिकांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले. या लसीकरण मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्वत:चे व समाजाचे कोविडपासून रक्षण करा, असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या