मुद्दा – जैवविविधतेचे रक्षण  महत्त्वाचे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिदुस्थानातून  सुमारे सत्तर वर्षांपूर्वी नामशेष झालेला  चित्ता पुन्हा एकदा हिंदुस्थानच्या भूमीवर रमणार आहे. हिंदुस्थानने कोटय़वधी रुपये खर्च करून आठ चित्ते नामिबियामधून आयात केले गेले आणि मध्य प्रदेशातील कुनो या अभयारण्यात  समारंभपूर्वक सोडण्यात आले. ही देशासाठी, वन्य जीव अभ्यासक आणि वन्य जीवप्रेमींसाठी आनंदाची गोष्ट आहे, परंतु याच जोडीला हिंदुस्थानात जी वन्य संपदा आहे, तिचे जतन होणे आवश्यक आहे.

प्राचीन काळात आपल्या ऋषीमुनींनी पृथ्वीचे वर्णन बहुरत्ना वसुंधरा असे केले आहे. ती जगातील सर्वात आदर्श असलेली  हिंदुस्थानची बहुरत्ना वसुंधरा अर्थात जैवविविधता  गेल्या काही वर्षांपासून संकटात आली आहे हे सत्य नाकारून चालणार नाही. अलीकडच्या काळात अनेक कारणांसाठी ही जैवविविधता नष्ट करण्याचा प्रयत्न मानवाकडून होत आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. कारण मानवाच्या निसर्गचक्रातील हस्तक्षेपामुळे अनेक प्रजाती धोक्यात आल्या आहेत. अनेक वाघासारखे प्राणी माणसाने नष्ट केले आहेत. त्यातच वाढते प्रदूषण, बदलते हवामान यामुळेसुद्धा जैवविविधतेचे अस्तित्व धोक्यात आले आहे.आज हिंदुस्थानात चित्त्यासारखे प्राणी आणले तरी जैवविविधतेचे महत्त्व टिकविणे आवश्यक आहे.

पृथ्वीवरील जैवविविधता अचंबित करणारी आहे. विविध प्रकारचे प्राणी, पक्षी आणि जलचर वनस्पती यांचा अफाट संचार पृथ्वीवर आहे. पूर्वी वेगळी सृष्टी होती, आता वेगळी सृष्टी आहे. अलीकडच्या काळात मानवामध्ये जीवसृष्टीची प्रचंड हानी होत आहे. एखादी प्रजाती विकसित होण्यासाठी  सृष्टीच्या नियमानुसार काही  काळ जावा लागतो, पण मानव आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी जीवसृष्टी पृथ्वीवरून नष्ट करत आहे.

पेंद्र सरकारने 1983 मध्ये वन्य जीवांच्या संरक्षणासाठी राष्ट्रीय वन्य जीव योजना सुरू करण्यात आली. याअंतर्गत वन्य जीवांना मानवी अतिक्रमणापासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्याची निर्मिती करण्यात आली. या कायद्यामुळे पेंद्र आणि राज्य सरकारांनी आपल्या देशात आणि राज्यात व्याघ्र  प्रकल्प राबवून वाघांची संख्या वाढवली आहे, परंतु मानवी हस्तक्षेपामुळे, विशेषतः जंगलतोडीमुळे वन्य प्राण्यांची आश्रयस्थाने सातत्याने भकास होत आहेत. त्यामुळे बिबटय़ासारखे प्राणी  जंगलातून मानवी वस्तीत येत आहेत. तसेच नैसर्गिक अन्नसाखळीचा महत्त्वाचा भाग असलेले वटवाघूळ, घार यांसारख्या अनेक पक्ष्यांची संख्या कमी होऊ लागली आहे, तर चिमणी, कावळा यांसारखे पक्षी  शहरी जीवनामुळे मानवासोबत सहजीवन जगत असतात, त्यांचीही संख्या कमी झाली आहे. जगातील अनेक वन्य जीवांच्या प्रजाती लुप्त होत आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार संपूर्ण जगभरात जीवजंतूंच्या एपंदर 130 लाख प्रजाती आहेत. त्यातील हजारो प्रजाती कधीच लुप्त झाल्या आहेत.

जैवविविधतेत आपला हिंदुस्थान मागे नाही. आपल्या महाराष्ट्रात जैवविविधता ही नैसर्गिक समृद्धीची  खाण आहे. सातारा जिह्यात  कास पठारावर फुलणाऱ्या असंख्य वनस्पती आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाने हिंदुस्थानातील पश्चिम घाटाची निवड जगातील निवडक जैवविविधता समृद्ध भागामध्ये केली. कारण जैवविविधतेने समृद्ध असलेला हा पश्चिम घाट दुर्मिळ जातीचे अनेक पशुपक्षी आणि हजारो वनस्पतींचे आगार आहे, परंतु अशा या  सृष्टीचे तसेच वन्य जीवांचे पृथ्वीवरील अस्तित्व अबाधित ठेवायचे असेल  तर वन्य जीवांना आणि  जंगलांना धोका उत्पन्न होता कामा नये. तसेच दुर्मिळ होत चाललेल्या प्रजातींचे आणि वनस्पतींचे संवर्धन, जमिनीची धूप रोखणे, आपल्या भागातील जीवसृष्टीची जोपासना इ. गोष्टी केल्या पाहिजेत. कारण आपणाला निसर्गाकडून मिळालेल्या जैवविविधतेचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे.

>> सुनील कुवरे