
रक्तदान हे श्रेष्ठदान असे म्हटले जाते. एखाद्याचा जीव वाचविण्यासारखं पुण्य नाही. हाच संदेश देत सुनिल पोळ यांनी गेल्या तीस वर्षांत शंभर वेळा रक्तदान केले आहे. वयाच्या 19 व्या वर्षी त्यांनी रक्तदानाला सुरुवात केली आज वयाच्या 48 व्या वर्षीही ते रक्तदान करत आहेत. त्यांच्या शंभराव्या रक्तदानासाठी त्यांचे पल्लवी रक्त पेढीचे संस्थापक भाऊ कोरगावकर, संचालक जयसिंग विश्वकर्मा व जनसंपर्क अधिकारी भीमराव काळेबाग यांनी त्यांचा सत्कार केला आहे.
‘वयाच्या 19 व्या वर्षी पासुन रक्तदान केले तो अनुभव अविस्मरणीय होत. त्या नंतर 1992-93 मध्ये झालेली दंगल व 12 मार्च मुंबई बॉम्ब स्फ़ोटात गेलेले निष्पाप बळी पाहून मन हेलावून गेलं होतं. तेव्हाच मनात कुठे भावना निर्माण झाली होती कि जर रक्तदान करून आपण लोकांना जीवदान देऊ शकतो. त्यानंतर मी नियमित रक्तदानाला सुरवात केली.’, असे पोळ सांगतात. पोळ हे सध्या कुर्ला नागरिक सहकारी बँक भांडुप पश्चिम येथे शाखाधिकारी असून गेल्या 21 वर्षापासून ग्राहक सेवेत आहे.































































