आमदारांच्या कामकाजाबाबत ‘प्रजा’ फाऊंडेशनने जाहीर केलेल्या अहवालात काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी प्रथम स्थान पटकावले असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आमदार सुनील प्रभू यांना दुसरे स्थान मिळाले आहे. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड तिसऱ्या स्थानी राहिल्या. पहिल्या तीनमध्ये भाजपच्या आमदाराला स्थान मिळू शकलेले नाही.
‘प्रजा’ने जाहीर केलेल्या अहवालानुसार पहिल्या पाच आमदारांचा विचार केल्यास त्यामध्ये भाजपच्या मनीषा चौधरी यांचे नाव चौथ्या स्थानी तर पाचव्या क्रमांकावर काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांचे नाव आहे. त्याचप्रमाणे भाजपचे अमित साटम हे सहाव्या, आशीष शेलार सातव्या क्रमांकावर आहेत.
मिंधे गट तळाला
यामिनी जाधव आठव्या, भाजपचे अतुल भातखळकर नवव्या आणि पराग आळवणी दहाव्या क्रमांकावर आले आहेत. या अहवालात तळाच्या तीन आमदारांत मिंधे गटाचे सदा सरवणकर आणि प्रकाश सुर्वे हे दोन आमदार आहेत. अजित पवार गटासोबत गेलेले नवाब मलिक यादीत शेवटच्या क्रमांकावर आहेत.
विधिमंडळ कामकाजाच्या दिवसांत 43 टक्के घट
या अहवालात प्रत्येक पक्षाच्या आमदारांची, मंत्र्यांची उपस्थिती, प्रश्नोत्तरे, विधिमंडळातील कामकाजातील सहभाग आणि सलग तीन वर्षांतील कामगिरी आदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला असल्याचे प्रजा फाऊंडेशनकडून सांगण्यात आले.
12 व्या विधानसभेत (हिवाळी सत्र 2009 – 2014) कामकाजाचे 210 दिवस होते, तर 14 व्या विधानसभेत (हिवाळी सत्र 2019 -, 2024) कामकाजाचे घटून 119 दिवस झाले. म्हणजेच त्यामध्ये 43 टक्के घट झाल्याचा दावा ‘प्रजा’कडून करण्यात आला आहे.
13 व्या विधानसभेत पहिल्या पाच आमदारांची गुणांची सरासरी 48.13 टक्के होती, ती 14 व्या विधानसभा कामकाज कामगिरीत घटून 34.81 टक्के झाली असल्याने लोकप्रतिनिधींच्या कामगिरीचा दर्जा घसरला असून ते आपली जबाबदारी पार पाडण्यात कमी पडत आहेत हे स्पष्ट झाले आहे, असा दावा ‘प्रजा’कडून करण्यात आला आहे.