आज शतकातील सर्वात मोठे खग्रास चंद्रग्रहण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

आज आषाढ पौर्णिमेच्या रात्री या शतकातील सर्वात मोठे म्हणजे जास्त वेळ खग्रास स्थिती असलेले खग्रास चंद्रग्रहण होणार असून ते हिंदुस्थानातून दिसणार असल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

सोमण म्हणाले की, आकाश निरभ्र असेल तिथून साध्या डोळ्यांनी हे खग्रास चंद्रग्रहण पाहता येईल. ग्रहणात चंद्रबिंब लाल काळसर रंगाचे दिसेल. ज्यावेळी खग्रास चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्र पृथ्वीपासून दूर असतो, तसेच तो ज्यावेळी पृथ्वीच्या छायेच्या मध्यातून भ्रमण करतो, त्यावेळी खग्रास स्थितीचा कालावधी जास्त असतो.

शुक्रवार, २७ जुलै रोजी रात्री ११.५४ वाजता ग्रहणास प्रारंभ होईल. उत्तररात्री १ वाजता संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने खग्रास स्थितीस प्रारंभ होईल. उत्तररात्री २.४३ वाजता खग्रास स्थिती समाप्त होईल आणि उत्तररात्री ३.४९ वाजता ग्रहण सुटेल. हे ग्रहण हिंदुस्थानप्रमाणेच संपूर्ण आशिया खंड, अंटार्क्टिका, रशिया, आफ्रिका, युरोप आणि दक्षिण अमेरिकेचा काही भाग येथून दिसेल.

– चंद्र पृथ्वीपासून सरासरी ३ लक्ष ८४ हजार किलोमीटर असतो. शुक्रवार, २७ जुलैच्या दिवशी तो पृथ्वीपासून दूर ४ लक्ष ६ हजार किलोमीटर अंतरावर असणार आहे. एकूण ग्रहणाचा कालावधी ३ तास ५५ मिनिटे एवढा जास्त असून खग्रास स्थितीचा काल १ तास ४३ मिनिटांचा असणार आहे.