
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरात प्रभावी आणि सुरक्षित लसीची प्रतीक्षा करण्यात येत आहे. रशियात कोरोनाच्या दोन लसी विकसीत करण्यात आल्या आहेत. हिंदुस्थानातही जानेवारीपर्यंत कोरोना लस मिळण्याची शक्यता आहे. मात्र, आता देशभरात थंडीला सुरुवात होणार आहे. थंडीच्या काळात कोरोनाचा धोका वाढण्याचा इशारा सुपर कॉम्प्यूटरने दिला आहे. तसेच याआधीही संशोधकांनी थंडीच्या काळात कोरोनाचे संक्रमण वाढण्याचा इशारा दिला आहे.
वातावरणातील आर्द्रता, थंडी किंवा उष्णता याचा कोरोना व्हायरसवर परिणाम होतो, असे संशोधनातून दिसून आले आहे. कोरोनाचा फैलाव वाढण्यात आर्द्रता आणि थंडीची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे थंडीच्या काळात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती संशोधकांनी व्यक्त केली आहे. याआधीही संशोधकांनी थंडीच्या काळात कोरोनाचा धोका वाढण्याचा इशारा दिला होता. आता सुपर कॉम्प्यूटरनेही असाच इशारा दिल्याने चिंता वाढली आहे. फुगाकु (Fugaku) नावाच्या सुपर कॉम्प्यूटरने याबाबतचा इशारा दिला आहे. रिकेन आणि कोब युनव्हर्सिटीने याबाबतचा अहवाल प्रकाशित केला आहे.
आर्द्रता आणि थंडीमुळे कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने घरे, कार्यालये, हॉल, सिनेमागृहे अशा बंदिस्त ठिकाणाही कोरोनाचा धोका वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. थंडीच्या काळात कोरोना व्हायरसचे संक्रमण पसरवणाऱ्या घटकांची संख्या दुप्पट होते. त्यामुळे कोरोना फैलावाचा धोका वाढत असल्याचे सुपर कॉम्प्यूटरमधून दिसून आले आहे. मात्र, बंदिस्त वातावरणात हवा खेळती ठेवली, खिडक्या उघडल्या किंवा ह्यूमिडिफायर्सचा वापर केल्यास कोरोनाचा धोका कमी करता येऊ शकतो, असेही सुपर कॉम्प्यूटरमधून दिसून आले आहे.
कोरोनाबाधितांद्वारे संशोधकांनी कोरोना व्हायरसचे कण हवेत पसरवले आणि फुगाकु सुपर कॉम्प्यूटरला वातावरणातील स्थितीचे विश्लेषण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यावरून हे निष्कर्ष कढण्यात आले आहेत. थंडीच्या दिवसात कोरोना संक्रमण रोखण्यासाठी मास्क आणि फेसशिल्ड प्रभावी नसल्याचेही संशोधनातून दिसून आले आहे. तसेच रेस्टॉरंट, हॉटेल, सिनेमाघरे अशा बंदिस्त ठिकाणी कोरोनाचा धोका वाढत असल्याचेही संशोधनातून दिसून आले आहे. तसेच प्रवासादरम्यान बस किंवा ट्रेनची खिडकी उघडून खेळती हवा ठेवल्यास संक्रमणाचा धोका कमी होत असल्याचेही संशोधनात नमूद करण्यात आले आहे.






























































