सामना ऑनलाईन, मुंबई
पालिकेच्या 714 शाळांमध्ये लवकरच जलद इंटरनेट आणि दूरध्वनी सुविधा सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये नव्याने सुरू होणाऱ्या 214 शाळांमध्येही ही सुविधा सुरू केली जाणार आहे. त्यामुळे पालिका शाळेतील विद्यार्थी जगाशी जोडले जाणार आहेत. ‘गुणवत्ता विकास’ उपक्रमांतर्गत पालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे.
पालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या माध्यमातून बदलत्या जगाची माहिती मिळावी, शाळेत असताना संपर्क साधता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सद्यस्थितीत पालिकेच्या 1243 शाळांपैकी 315 शाळांमध्ये महानगर टेलिफोन निगमकडून इंटरनेट व दूरध्वनीची सुविधा 2007 पासून देण्यात येत आहे. तर 406 शाळांमध्ये 2015 मध्ये संगणक उपलब्ध करून देण्यात आले आहे. तर आता उर्वरित 714 शाळांमध्येही ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी नवीन कॉम्बो प्लॅन-450 प्रति जोडणीसाठी द्यावे लागणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मांडला जाणार आहे.
अशी आहेत वैशिष्टय़े
- दरदिवशी 30 जीबी डाटा मिळणार,
- प्रतिमहा प्रतिजोडणी एकूण अपेक्षित खर्च 532 रुपये
- या उपक्रमासाठी एकूण 45,58,176 रुपये खर्च येणार
- पालिकेच्या 579 प्राथमिक व 135 माध्यमिक शाळांमध्ये सुविधा





























































