
पाण्याच्या टँकरची धडक लागल्याने सुपरवायझरचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अर्जुन क्षीरसागर असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी टँकर चालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
अर्जुन क्षीरसागर हे एका खासगी इन्फ्रा कंपनीत साईड सुपरवायझर म्हणून काम करत होते. ते चुनाभट्टीच्या बीकेसी कनेक्क्टर पुलाखाली सुरू असलेल्या ठिकाणी काम करत होते. नुकतेच ते साईडवर गेले होते. रात्री पायलिंग काम सुरू होते तेव्हा गार्डनला पाणी देण्यासाठी एक टँकर आला. टँकर चालक हा झाडांना पाणी टाकण्यासाठी टँकर मागे-पुढे नेत होता तेव्हा टँकरची अर्जुन यांना धडक बसली. त्या धडकेत अर्जुन हे जखमी झाले.
अर्जुन यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघाताची माहिती समजताच चुनाभट्टी पोलीस घटनास्थळी आले.
साईड इंजिनीअरने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी टँकर चालकाविरोधात गुन्हा नोंद केला. अपघातानंतर टँकर चालक हा पळून गेला आहे.
तरुणाची हत्याप्रकरणी दोघांना अटक
मुलीला मारहाण केली या रागाच्या भरात तिच्या वडिलांनी आणि भावाने तरुणाला बेदम मारहाण केली. त्या मारहाणीत हुसेन मोहम्मद शेख या तरुणाचा मृत्यू झाला. घडल्याप्रकरणी वरळी पोलिसांनी योगेश धीवर आणि समीर धीवर या दोघांना अटक केली. त्या दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. हुसेन हा वरळी परिसरात राहत होता, तर धीवर कुटुंबीयदेखील त्याच परिसरात राहतात. दोन दिवसांपूर्वी हुसेनने योगेशच्या मुलीला मारहाण केली होती. याचा वचपा काढण्यासाठी योगेशने हुसैनला गाठले. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. रागाच्याभरात त्या दोघांनी हुसेनला मारहाण केली. जखमी हुसेनला उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मौजमजेसाठी फसवणूक करणारा अटकेत
मौजमजेसाठी फसवणूक करणाऱयाला मालाड पोलिसांनी अटक केली. युगांक शर्मा असे त्या आरोपीचे नाव आहे. त्याने तक्रारदारांना अमरनाथ यात्रेबाबत माहिती देत खर्च 2 लाख 34 हजार रुपये सांगितला. तक्रारदाराने पैसे पाठवले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. वरिष्ठ निरीक्षक दुष्यंत चव्हाण यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक संजय बेडवाल, उप निरीक्षक अक्षय मांदळे, फर्नांडिस, डोईफोडे आदींच्या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी युगांकला ताब्यात घेतले असून चौकशी केल्यावर त्याने फसवणुकीची कबुली दिली.
पैशाचा अपहार करणारा अटकेत
कंपनीच्या पैशाचा अपहार करणाऱयाला खार पोलिसांनी अटक केली. तक्रारदार हे खासगी कंपनीत लायझनिंग अधिकारी म्हणून काम करतात. त्या कंपनीत आरोपी हा लायझनिंग अधिकारी म्हणून काम करत होता. एप्रिल महिन्यात त्याला कंपनीने त्याला 75 हजार रुपये एकाला देण्यासाठी दिले होते. मात्र तो ती रक्कम संबंधित व्यक्तीला न देता तो गावी पळून गेला होता. त्यामुळे तक्रारदार याने त्याला फोन केला. तसेच काहीच प्रतिसाद दिला नाही. घडल्या प्रकरणी तक्रारदार याने खार पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला. गेल्या पाच महिन्यांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर पोलिसांना त्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे त्याला अटक केली. त्याला अटक करून आज न्यायालयात हजर केले होते.