एआयचा वापर करून वकिलांनी बनवल्या याचिका, सर्वोच्च न्यायालय वैतागले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआयची जगभरात चर्चा आहे. एआय लोकांच्या नोकऱया खाणार अशी भीती सर्वत्र निर्माण झाली आहे. मात्र एआय किती धोकादायक आणि अविश्वासार्ह आहे, हे सर्वोच्च न्यायालयोन उघड केले आहे. अनेक वकील चक्क एआयचा वापर करून याचिका तयार करत आहेत. या याचिकांमध्ये न्यायालयाने कधीही न दिलेले निकाल आणि अस्तित्वातच नसलेल्या खटल्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून न्यायालयायाने संताप व्यक्त केला आहे.

सरन्यायाधीश सूर्य कांत, न्या. जॉयमाल्य बागची आणि न्या. बी.व्ही. नागरत्ना यांच्या खंडपीठासमोर एका याचिकेत चक्क ‘मर्सी वि. मॅनकाइंड’ या खटल्याचा उल्लेख आला. रूप रेखा वर्मा या शिक्षण क्षेत्रातील व्यक्तीने राजकीय वक्तव्यांसंदर्भात दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी करताना सरन्यायाधीशांनी एआयच्या मुद्दय़ावर स्पष्ट मत मांडले. सरन्यायाधीश म्हणाले, काही वकील याचिका तयार करण्यासाठी एआयची मदत घेत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. हे पूर्णपणे अयोग्य आहे. न्या. दीपांकर दत्ता यांच्यासमोर एका याचिकेत एक नव्हे तर अनेक निकालांचा दाखला देण्यात आला होता, याकडे सरन्यायाधीशांनी लक्ष वेधले.

न्या. नागरत्ना यांनीही अशा प्रकारांवर नाराजी व्यक्त करताना म्हटले की, ‘मर्सी वि. मॅनकाइंड’ या कधीही अस्तित्वात नसलेल्या प्रकरणाचा धक्कादायक उल्लेख एका ठिकाणी करण्यात आला. काही वेळा निकालांचे दाखले व संदर्भ बरोबर असतात, मात्र त्यात निकालांबाबत खोटी वक्तव्ये जोडलेली असतात. त्यामुळे त्यातील माहितीची पडताळणी करणे कठीण होते. तसेच न्यायाधीशांवर अतिरिक्त ताण पडतो.

याचिका लिहिण्याच्या कलेचा ऱ्हास – न्या. बागची

एआयचा वापर करून लिहिलेल्या याचिकांवर संताप व्यक्त करताना न्या. बागची म्हणाले की, याचिका लिहिण्याच्या कलेचा अलीकडच्या काळात ऱहास होत असल्याचे दिसत आहे. अनेक याचिकांमध्ये जुन्या खटल्यांमधील केवळ लांबलचक उल्लेख करण्यात येतात. हे न्यायव्यवस्थेसाठी घातक आहे, असे न्या. बागची म्हणाले.