मिलॉर्ड, मला हायकोर्टाचे न्यायमूर्ती बनवा…! याचिकेवर न्यायालय भडकले, दंड ठोठावण्याचा इशारा

सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकाकर्त्याला चांगलेच फटकारले. जी. व्ही. श्रवणकुमार नावाच्या याचिकाकर्त्याने स्वतःला तेलंगणा हायकोर्टाचे न्यायमूर्ती बनवण्याची मागणी केली होती. ही व्यवस्थेची थट्टा असल्याची संतप्त टिपणी करत सर्वोच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली. तसेच अशी याचिका दाखल करणाऱ्या वकिलाची सनद रद्द केली पाहिजे, असेही म्हटले.

सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी केली. सरन्यायाधीश भूषण गवई संतापून म्हणाले, मी एक काम करतो. मी कॉलेजियम बैठकीसाठी तीन वरिष्ठ वकिलांच्या खंडपीठाची नियुक्ती करतो. ही तर व्यवस्थेची थट्टा आहे. ‘हायकोर्टाच्या न्यायमूर्तींच्या याचिकेबद्दल आम्ही कधी सुनावणी केलेय का?’ असा सवालही गवई यांनी विचारला. अशा प्रकारच्या याचिकांवर दंड लावण्याचा विचार न्यायालय करू शकते, असेही ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर याचिकाकर्त्याने याचिका मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर न्यायालयाच्या अनुमतीने याचिका मागे घेण्यात आली.