
फॉलोअर्स वाढवण्यासाठी बेभान, अतिरेकी वागणाऱ्या सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्सना सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने चांगलीच चपराक लगावली. अभिव्यक्तीच्या नावाखाली वाट्टेल ते बोलण्याची मुभा नाही. व्यावसायिक आणि प्रतिबंधित भाषणे मूलभूत अधिकाराच्या कक्षेत मोडत नाहीत, असे स्पष्ट करीत न्यायालयाने ‘इंडियाज गॉट लेटेंट’चा होस्ट समय रैनासह पाच सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्सना दिव्यांग लोक आणि दुर्मिळ आजारांची खिल्ली उडवल्याबद्दल बिनशर्त माफी मागण्याचे आदेश दिले.
पॉडकास्ट व अन्य शोमध्ये दिव्यांग लोकांच्या भावना दुखावल्याबद्दल सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्सविरोधात कारवाईचे निर्देश द्या, अशी विनंती करीत ‘क्युअर एसएमए फाऊंडेशन’ स्वयंसेवी संस्थेने याचिका दाखल केली. त्यावर न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. खंडपीठाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत महत्त्वपूर्ण भाष्य करीत सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्सचे कान उपटले. तसेच त्यांना बिनशर्त माफी मागण्याचे आदेश देतानाच न्यायालय योग्य तो दंड ठोठावण्याचा विचार करणार असल्याचे नमूद केले. इन्फ्लूएन्सर्सने ज्या प्रकारे दिव्यांग लोकांचा अपमान केला आहे, त्यापेक्षा जास्त पश्चाताप इन्फ्लूएन्सर्सना झाला पाहिजे. त्यानंतर दंड ठोठावण्याचा विचार न्यायालय करेल, असेही खंडपीठाने सुनावले. न्यायालयाने या प्रकरणात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला हस्तक्षेप करण्यास मुभा दिली. तसेच समाजातील सर्व घटकांचा विचार करुन सोशल मिडीयातील ’कंटेंट’वर नियंत्रण ठेवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले. त्यावर सरकारकडून गाईडलाईन्स बनवण्याची प्रक्रिया सुरु आहे, असे ऍटॉर्नी जनरल आर. वेंकटरमण यांनी न्यायालयाला कळवले.
खडे बोल
- अभिव्यक्तीच्या नावाखाली वाट्टेल ते बोलण्याची मुभा नाही, याचे भान ठेवा. वर्णभेद तसेच विविध समुदायांवर विनोद करताना सावधगिरी बाळगली पाहिजे.
- सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर स्वार्थ साधण्यासाठी केला जातो. जेव्हा तुम्ही खूप मोठे होता, खूप फॉलोअर्स असतात, तेव्हा तेथे केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसते. ते पूर्णपणे व्यावसायिक असते.
- विनोद हा जीवनाचा एक भाग आहे. आपण स्वतःवर हसतो. पण जेव्हा इतरांवर हसायला सुरुवात करतो, तेव्हा संवेदनशीलतेची जाणीव असली पाहिजे.
- हा केवळ दिव्यांगांपुरता मर्यादित विषय नाही. आपला देश विविध समुदायांचा आहे. आज दिव्यांगांचा विषय आहे, उद्या महिला, मुले, वृद्धांच्या बाबतीत हे घडू शकते.