परमबीर सिंह यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; चौकशी थांबवण्याचे आदेश

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधातील चौकशी थांबवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. परमबीर सिंह यांच्याविरोधातील आर्थिक घोटाळ्याचे प्रकरण गोंधळाची स्थिती निर्माण करणारे आहे, असे नमूद करतानाच न्यायालयाने याप्रकरणी 9 मार्चपर्यंत निर्णय देऊ असे सांगितले. सिंह यांच्याविरोधातील प्रकरणांचा तपास सीबीआयकडे सोपवायचा की नाही याबद्दलही त्याच दिवशी निर्णय दिला जाईल, असेही न्यायालयाने सांगितले. त्यामुळे सिंह यांना तूर्त दिलासा मिळाला आहे.

न्यायमूर्ती एस. के. कौल आणि न्यायमूर्ती एम. एम. सुंद्रेश यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. ‘परमबीर सिंह यांच्याविरोधातील चौकशी म्हणजे गोंधळाचा प्रकार आहे. या प्रकरणात कुणीही स्वच्छ चारित्र्याचे नाही. हे फारच दुर्दैवी आहे. यामुळे पोलिसांवरील जनतेच्या विश्वास उडण्याची शक्यता आहे. परंतु कायद्याची प्रक्रियाही अखंड राहिली पाहिजे.’, असे मतही खंडपीठाने मांडले. न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जाईल, असे राज्य सरकारचे वकील दरीअस खंबाटा यांनी यावेळी सांगितले. सीबीआयच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली.