भांडण दिराशी, सोडले पतीला! हर्षवर्धन यांच्या भाजप प्रवेशावर सुळेंची पहिली प्रतिक्रिया

2081

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाजपा प्रवेशाबाबत प्रश्न उपस्थित झाला असता खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, इंदापूरच्या जागेसंदर्भात आघाडीच्या बैठकीत विषयच झालेला नाही. असे असताना त्याबद्दल गैरसमज करून त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला, हा त्यांचा वैयक्तिक आणि काँग्रेस पक्षांतर्गतचा प्रश्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करून त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला, अनाकलनीय आहे. भांडण दिराशी, सोडले पतीला असे म्हणावे लागेल. भांडण आमच्याशी असेल तर त्यांनी काँग्रेस पक्ष का सोडला, असा प्रतिप्रश्न केला.

मंदीमुळे सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न गंभीर – सुप्रिया सुळे 

काँग्रेसला मोठा धक्का, हर्षवर्धन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

राहुल गांधींना भेटल्याच्या आरोपाचे खंडण करीत सुप्रिया सुळे म्हणाल्या, राहुल गांधी, हर्षवर्धन पाटील आम्ही एकत्र भेटलो नाही, बैठकही झालेली नाही़ पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर मी स्वत: हर्षवर्धन पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला, मात्र ते दोन दिवस नॉट रिचेबल होते. जिल्हा परिषद स्थायी समितीवर काँग्रेस कोट्यातून एक जागा भरण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांच्या मुलीचे आणि काँग्रेसकडून अन्य एका सदस्याचे नाव समोर आले होते. कोणाची नियुक्ती करावयाची याचा पेच निर्माण झाल्यामुळे पाटील यांना फायदा होईल म्हणून स्थायी समितीची जागा भरण्यास स्थगिती देण्यास सांगितले होते, असेही सुळे यांनी स्पष्ट केले.

‘हात’ सोडला

तत्पूर्वी बुधवारी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. मुंबईतील गरवारे क्लबमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी कमळ हाती घेतले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बड्या नेत्याने ‘हात’ सोडल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या