विधिमंडळात रमी खेळल्याचे बक्षीस म्हणून माणिकराव कोकाटेंना क्रीडा खाते; सुप्रिया सुळेंकडून सरकारची चिरफाड

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी विधिमंडळात माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल केला होता. यानंतर विरोधकांनी रान उठवत कोकाटे यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने कोकाटे यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांचे फक्त खाते बदलले. त्यांच्याकडे आता क्रीडा खाते देण्यात आले आहे. यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

सुप्रिया सुळे यांनी एक्स (आधीचे ट्विटर) वर एक पोस्ट शेअर करत सरकारवर हल्ला चढवला. राज्यातील कृषी क्षेत्र पूर्णपणे कोलमडून पडलेले असताना विधिमंडळात बसून रमी खेळणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर किती संवेदनशील असतील? याहून कहर म्हणजे या कृषीमंत्र्यांचे केवळ खाते बदलून अभय देणारे सत्ताधारी किती गंभीर असतील ? याची शंका आल्याशिवाय राहत नाही. आपले पद आणि जबाबदारी यांची किंचितही जाणीव नसणारी व्यक्ती मंत्रीमंडळात आहे याची खरंतर राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना खंत वाटली पाहिजे, असा टोला सुळे यांनी लगावला.

त्या पुढे म्हणाल्या की, महाराष्ट्र शासनाला ‘भिकारी’ म्हणून राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळविणाऱ्या मंत्रीमहोदयांना नारळ देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री महोदयांनीच पुढाकार घ्यायला पाहिजे. विधिमंडळात रमी खेळल्याचे बक्षीस म्हणून त्यांना राज्याचे क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रीपद देण्याचा निर्णय खरोखरच अनाकलनीय आहे. या सरकारचे प्राधान्यक्रम काय आहेत याची चिरफाड यामुळे झाली.

एकिकडे राज्यातील तरुण पिढी ऑनलाईन रमीच्या मागे लागून बरबाद होत आहे. तिच्यावर बंदी घालण्याची मागणी होत असताना माणिकराव कोकाटे यांना विधिमंडळात रमी खेळल्याचे बक्षीस म्हणून क्रीडा व युवक कल्याण यासारखे महत्वाचे खाते दिले जाते यासारखा दुसरा क्रूर विनोद नाही, अशी चिरफाड सुळे यांनी केली.

मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की कृपया आपण माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊन राज्याची प्रतिष्ठा जपण्याचे काम करावे, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली.

शेतकऱ्यांची झाली, आता खेळाडूंची उपेक्षा; पदके नाही, ‘रम्मी’कडूनच बक्षिसांची अपेक्षा! अंबादास दानवेंचा कवितेतून सरकारला टोला