
मंत्रिमंडळामधील मंत्री एकमेकांना गॅस सिलिंडरसाठी पत्र लिहित असतील तर संकट गंभीर आहे. केंद्र सरकारने लोकांना वास्तव सांगावे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्या दिल्लीत माध्यमांशी बोलत होत्या. मलबार हिलमधील 16 जैन मंदिरांना प्रत्येकी पाच गॅस सिलिंडर द्या, अशी मागणी राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला सुप्रिया सुळे उत्तर देत होत्या.
लोकांना गॅस सिलिंडरच्या टंचाईचा मोठा फटका बसत आहे. हॉटेलमध्ये जेवण व्यवस्थित मिळत नाही. कॉलेजमधील खानावळी, कॅन्टिनमध्येही जेवण मिळत नाही. सिलिंडर उपलब्ध करून देण्यासाठी एक मंत्री दुसऱ्या मंत्र्याला पत्र लिहित आहे. त्यामुळे गॅस टंचाई आहे हे वास्तव सरकारने मान्य केले पाहिजे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांनी पीएनजीबाबत केलेल्या विधानावरही भाष्य केले.
जैन मंदिरांना प्रत्येकी पाच सिलिंडर द्या! लोढा यांचे छगन भुजबळांना पत्र
तीन महिन्यांनी कदाचित एलपीजी गॅस सिलिंडर पुरवठा बंद होईल, असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला होता. याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सरकारने आम्हाला कनेक्शन द्यावे, आमची तयारी आहे. तुम्ही मायबाप सरकार आहात. तुम्ही कनेक्शन द्या. आम्ही तयार आहोत. आम्हाला कनेक्शन मिळाल्याशी मतलब.
रोहिणी खडसे यांचा घणाघात
मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जैन मंदिरांना प्रत्येकी पाच सिलिंडर देण्याची मागणी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सरकारवर घणाघात केला आहे. मागील 10-15 दिवसांपासून आम्ही ओरडून ओरडून सांगतोय की देशभरासह महाराष्ट्रात गॅस सिलिंडरची मोठी टंचाई आहे. दोन दिवसांपूर्वी एका वृद्ध माजी सरपंचाचा सिलिंडरच्या रांगेत मृत्यू झाला तरी सरकार आणि सत्ताधारी आमदार म्हणतात “कुठंय टंचाई?”, “25 दिवसांत सिलिंडर मिळते”, “All is Well”. आता सरकारमधील मंत्री लोढा साहेबांनी जैन मंदिरांना प्रत्येकी पाच सिलिंडर देण्याची मागणी दुसरे मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे. खरंतर मंत्री महोदयांचे आभार मानले पाहिजे. त्यांनी एकाप्रकारे कबुली दिली की राज्यात सिलिंडरची प्रचंड टंचाई आहे, या मागणीच्या माध्यमातून त्यांनी सरकारच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम केले आहे. आता सरकाराने फक्त एक करावे, सिलिंडर टंचाईमुळे आणखी बळी जाऊ नयेत यासाठी त्वरित उपाययोजना करावी, असे रोहिणी खडसे म्हणाल्या.



























































