
‘राज्यातील अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, याबाबत गेल्या दोन महिन्यापासून केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासह महाराष्ट्र सरकारकडे मागणी केली आहे. सध्या अतिवृष्टीमुळे अन्नधान्य पिकवणारा शेतकरी आणखी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत एक वर्षापूर्वी दिलेले आश्वासन या सरकारला पूर्ण करता आले नाही. त्यामुळे शक्तिपीठ महामार्गाला 80 हजार कोटी घालविण्यापेक्षा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी,’ अशी सूचक मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज केली. याबाबत लवकर निर्णय न झाल्यास रस्त्यावर उतरून लढा देण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. मंगळवारी सकाळी करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतल्यानंतर खासदार सुळे प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे दोन महत्त्वाची खाती आहेत. राज्यावर संकट आले तर केंद्राकडे मदतीसाठी पाहावे लागते, त्यामुळे संसदेत अधिवेशन सुरू असताना खासदारांच्या शिष्टमंडळासह त्यांना भेटून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी केली होती. याबाबत महाराष्ट्र सरकारला सांगण्याची विनंतीही त्यांच्याकडे केली; पण याबाबत काहीच कार्यवाही झाली नाही. गेल्या वर्षी याच सरकारने हमीभाव आणि शेतकरी कर्जमाफीसह अनेक आश्वासने दिली होती. आता एक वर्ष झाले तरी अजून ती पूर्ण झालेली नाहीत. ‘लाडकी बहीण’ योजनेतूनही अनेक बहिणींची नावे वगळली आहेत.
त्यामुळे हे सरकार पूर्णपणे असंवेदनशील असल्याची टीका करत, सध्या गेल्या दोन महिन्यापासून ओला दुष्काळ जाहीर करा व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा म्हणून आपण महाराष्ट्र सरकारला सांगत असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादीचा एक भाग भाजपसोबत असला, तरी त्यांचेही कौटुंबिक संबंध आहेत. आमचे मतभेद आहेत; पण मनभेद नसल्याचेही सुळे यांनी सांगितले.
…मग हैदराबाद गॅझेटचा उपयोग काय, हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे!
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेतून हैदराबाद गॅझेटचा नेमका उपयोग काय? त्यामुळे नेमका फायदा काय? हे समजावून सांगावे, असे स्पष्ट मत व्यक्त करीत, मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. महाराष्ट्र सरकारने कॉप्रिहेन्सिव्ह आरक्षणाचे बिल बनवावे. त्याला आपण ताकदीने पाठिंबा देऊ, असे स्पष्ट मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.