मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी खुर्चीसाठी गरीब मुलांच्या तोंडचा घास हिरावला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वार्थासाठी, स्वतःच्या खुर्च्या वाचवण्यासाठी राज्यातील गरीब कष्टकरी मुलांच्या तोंडचा घास हिरावून घेण्याचे पाप केले, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज केली.

इंदापूरच्या निमगाव केतकी येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस (ईडी) सरकारवर जोरदार निशाणा साधला. वेदांता-फॉक्सकॉनसारखी मोठी कंपनी सरकारने दुसऱया राज्यात घालवली. आपल्या दीड लाख मुला-मुलींच्या नोकऱया घालवण्याचे काम या सरकारने केले, असे त्या म्हणाल्या. यामुळे पुणे जिह्याचे सर्वात मोठे नुकसान झाल्याचेही त्या पुढे म्हणाल्या.

वेदांता-फॉक्सकॉनपेक्षाही मोठा प्रकल्प आणू असे मुख्यमंत्री म्हणत आहेत. पण नवीन सरकार येऊन अडीच महिने झाले तरी अजून पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत, असे त्या म्हणाल्या. पालकमंत्री नसल्याने प्रत्येक वेळी नागरिक लहानसहान कामांसाठी मुंबईत जाणार का, असा सवालही त्यांनी केला. पुणे जिह्यात जनतेच्या विकासकामांचे डीपीडीसीचे 800 कोटी रुपये सरकारने थांबवल्याचा आरोपही सुप्रिया सुळे यांनी केला.