
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी लोकसभेत शून्य प्रहरात राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा मुद्दा अत्यंत आक्रमक आणि भावूकपणे उपस्थित केला. देशाच्या उपमुख्यमंत्र्यांच्या अपघाताचा एफआयआर नोंदवण्यासाठी जर त्यांच्या कुटुंबाला संघर्ष करावा लागत असेल, तर सामान्य माणसाने न्याय कोणाकडे मागायचा?” असा संतप्त सवाल त्यांनी केंद्र सरकारला विचारला.
सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणात रेल्वेच्या CAG रिपोर्टचा दाखला देत वाढत्या अपघातांवर चिंता व्यक्त केली. 28 जानेवारीला अजित पवार यांच्या विमानाचा बारामतीजवळ अपघात झाला. याची आठवण करून देत सुप्रिया सुळे म्हणाले की, आज माझ्या भावाला जाऊन बरोबर दोन महिने झाले. एखाद्या कुटुंबातला कर्ता पुरुष जातो, तेव्हा त्या कुटुंबावर काय ओढवते हे आम्ही भोगले आहे. सुरक्षितता हा केवळ तांत्रिक मुद्दा नसून तो मानवी आयुष्याशी निगडित आहे.
या प्रकरणात राजकारण आणायचे नसल्याचे स्पष्ट करत सुप्रिया सुळे यांनी एफआयआर नोंदवण्यास होणाऱ्या विलंबावर बोट ठेवले. रोहित पवार यांनी एफआयआरसाठी अनेक राज्यांचे उंबरठे झिजवले. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या अपघाताची साधी तक्रार नोंदवून घ्यायला एवढी अडचण का येते? अजित पवार हे केवळ माझे भाऊ नव्हते, तर महाराष्ट्राचे लाडके नेते होते. अशा मोठ्या नेत्याच्या अपघाताची सखोल चौकशी व्हायला नको का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
बारामती विमान अपघात प्रकरणी कर्नाटकात एफआयआर दाखल, रोहित पवार यांची माहिती
सुरुवातीला ब्लॅक बॉक्स मिळणार असल्याचे सांगण्यात आले, नंतर तो खराब झाल्याचे सांगितले. माझी केंद्र सरकारला हात जोडून विनंती आहे की, या प्रकरणाची पारदर्शक आणि कालबद्ध चौकशी व्हावी. मग तो अहमदाबादचा क्रॅश असो, बिपिन रावत यांचा अपघात असो किंवा एअर ॲम्बुलन्सचा, प्रत्येक कुटुंबाला समान न्याय मिळाला पाहिजे, असेही यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.
रोहित पवारांकडून आभार
दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या या भाषणाचा व्हिडिओ शेअर करत आमदार रोहित पवार यांनी त्यांचे आभार मानले आहेत. सुप्रियाताईंनी अत्यंत तळमळीने संसदेत हा विषय मांडला. सरकारने आता तरी गांभीर्याने दखल घेऊन अजितदादांना न्याय मिळवून द्यावा, अशी भावना रोहित पवार यांनी व्यक्त केली.
अजितदादांना न्याय मिळावा यासाठी आज खा. सुप्रियाताई यांनी झिरो अवरमध्ये अंत्यत तळमळीने आणि प्रभावी शैलीत संसदेत या विषयाची मांडणी करुन अजितदादांना न्याय देण्याची मागणी सरकारकडं केली. सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन अजितदादांना न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करावं, ही विनंती..!… pic.twitter.com/tzJUiRm4k3
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 27, 2026






























































