सत्ताधारी पक्षातील आमदारांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही का? सुप्रिया सुळेंनी लगावला टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रात मराठा आरक्षण प्रकरणी आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे. तर राज्यातील ठिकठिकाणी मराठा समाजाचं आंदोलन हिंसक वळणावर पोहोचल्याचं दिसत आहे. त्याचा परिणाम आता अनेक आमदारांवरही झालेला पाहायला मिळत आहे. सत्ताधारी पक्षांमधील काही आमदारांनी मंगळवारी दुपारी राजभवनाबाहेर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन केलं. या आंदोलनावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्ताधारी पक्षांना टोला लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये त्यांनी हा टोला लगावला आहे. सत्ताधारी पक्षातील आमदारांनी आज मराठा आरक्षणप्रश्नी राज्यपाल भवनासमोर आंदोलन केलं. तसेच राज्यपालांची भेट घेतली. याचा अर्थ काय होतो? सत्तेतील आमदारांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर विश्वास नाही का? विशेष म्हणजे आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक होती. तेथे यासंदर्भात चर्चा होणार होती. ज्या राजभवनाबाहेर आमदार आंदोलन करत होते तिथून सह्याद्री अतिथीगृह (जिथे मंत्रिमंडळाची बैठक पार पडली) हे अंतर केवळ पाच ते सहा मिनिटांचे आहे. पण या आमदारांपैकी कुणीही तिकडे गेले नाही, असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

‘सह्याद्री अतिथीगृह सोडून सत्ताधारी पक्षातील आमदारांनी राज्यपाल भवनासमोर आंदोलन केले. यावरून या आमदारांचा सरकारवर विश्वास राहिला नसल्याचे दिसून येते. या सरकारमध्ये धोरणलकवा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. महाराष्ट्रातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेची नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने राजीनामा देणे गरजेचे आहे.’असंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.