सुरत-चैन्नई महामार्गाची मोजणी 11 जुलैपर्यंत होणार पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती

सुरत-चेन्नई महामार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, सोलापूर जिह्यातील बार्शी, अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यांतून हा महामार्ग जाणार आहे. 5 जूनपासून जमीन मोजणीचे काम सुरू करण्यात आले होते. हे काम सर्व टीमने वेगाने केल्याने अंतिम टप्प्यात असून, 11 जुलैपर्यंत सर्व गावांमधील मोजणी रोव्हरद्वारे होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

सुरत-चेन्नई नवीन महामार्गाच्या मोजणीबाबतच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी शंभरकर बोलत होते. बैठकीला राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस, उपजिल्हाधिकारी तथा महामार्गाच्या सक्षम अधिकारी अरुणा गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, भूमी अभिलेखचे जिल्हा अधीक्षक हेमंत सानप, अनिल विपत उपस्थित होते, तर वन, सार्वजनिक बांधकाम, भूमी अभिलेख विभागाचे प्रतिनिधी ऑनलाइन उपस्थित होते.

सुरत-चेन्नई हा महामार्ग ग्रीन कॉरिडॉर आहे. हा महामार्ग बार्शी तालुक्यातील 15, दक्षिण सोलापुरातील चार आणि अक्कलकोट तालुक्यातील 16 अशा 35 गावांमधून जाणार होता. मात्र, बार्शी तालुक्यात घाणेगाव हे गाव वाढले आहे. महामार्गातील बार्शी तालुक्यातील सर्व गावांच्या जमिनीची मोजणी पूर्ण झाली असून, वाढलेल्या एका गावाची मोजणी सोमवारी पूर्ण होईल. दक्षिणमधील सर्व चारही गावांची मोजणी पूर्ण झाली आहे. अक्कलकोट तालुक्यातील सहा गावांची आतापर्यंत मोजणी झाली आहे.

शंभरकर म्हणाले, ‘सुरत-चेन्नई महामार्गासाठी तिन्ही तालुक्यांतील जमिनीच्या मोजणीसाठी 10 रोव्हर मशिन देण्यात आल्या होत्या. यामुळे ही मोजणी अचूकपणे करण्यात आली आहे. तिन्ही तालुक्यांतील एकूण 642.1104 हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात येणार आहे. यामुळे सर्व संबंधित विभागांनी आपापली कामे चोखपणे पार पाडावीत. संबंधित विभागांनी मोजणीच्या वेळी उपस्थित राहून काम केले, त्यामुळे मोजणी सुरू असतानाच पंचनामे, मूल्यांकन करणे सोपे झाले. अक्कलकोट तालुक्यात काम कमी झाल्याने दोन टीमद्वारे काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. मोजणीच्या ठिकाणी पंचनामे, मूल्यांकन करण्यासाठी कृषी, सार्वजनिक बांधकाम, वन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून सहकार्य करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

12 तासांचे अंतर होणार कमी

सुरत-चेन्नई हे अंतर 1290 किलोमीटर असून, हे अंतर जाण्यासाठी 30 तास लागत होते. या महामार्गामुळे आता 18 तासांत हे अंतर पार होणार आहे. 8200 कोटींचा हा प्रकल्प असून, महामार्गामुळे स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. जमिनींच्या किंमती वाढून मिळणार आहेत.

पंचनामे करताना काळजी घ्या

 मोजणी करताना कोणाही शेतकऱयांचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी घ्या. पाइपलाइन, विहिरी, फळबागा यांची माहिती घ्या. जिराईतचे क्षेत्र बागायत होता कामा नये, याची काळजी घ्या. झाडांची संख्या, इतर मालमत्ता याबाबत काळजीपूर्वक निर्णय घ्यावा, असेही जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.

15 जुलैपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करा

 अक्कलकोट तालुका सोडला, तर मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. मोजणी झालेल्या गावांचा मोजणीचा गोषवारा (जीएम शीट) प्रत्येकांनी सादर करावा. यासाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणने सहकार्य करावे. थ्रीडी अधिसूचना जाहीर करावयाची असल्याने सर्व विभागांनी समन्वयाने 15 जुलैपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना शंभरकर यांनी दिल्या.