
सूरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गासाठी घेतल्या जाणाऱ्या शेतजमिनीच्या गट क्रमांकाची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये बार्शी, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील 34 गावांतून 129 किमी महामार्ग जाणार आहे. त्यासाठी 642 हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. ही जमीन खासगी वाटाघाटीने घेण्यात येणार आहे. येत्या सहा महिन्यांत ही प्रक्रिया मार्गी लावणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. यापूर्वी शहरासाठी बाह्यवळण मार्गाचा यामध्ये समावेश होता. पण ती गावे यामध्ये प्रसिद्ध करण्यात आली नाहीत.
धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुका, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातून हा महामार्ग जातो. बार्शी तालुक्यातून पुन्हा तुळजापूर तालुक्यात, त्यानंतर दक्षिण सोलापूर, अक्कलकोट तालुक्यातून कर्नाटकात हा महामार्ग जाणार आहे. 26 एप्रिल रोजी रस्ते मंत्रालयाच्या वतीने राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये दक्षिण सोलापूर, बार्शी व अक्कलकोट तालुक्यातील शेतजमिनीच्या गट क्रमांकासह प्रसिद्धी करण्यात आली. अक्कलकोट तालुक्यातून सर्वाधिक लांबीचा महामार्ग असून, त्याखालोखाल बार्शी तालुक्यातील गावे आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील फक्त चार गावांचा समावेश आहे. धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील 22, तर तुळजापूर तालुक्यातील 13 गावांचा समावेश आहे.
या गावांचा समावेश
अक्कलकोटः अक्कलकोट ग्रामीण, बोरेगाव, चपळगाव, चपळगाववाडी, दहिटणेवाडी, डेंबरजवळगे, दुधनी ग्रामीण, हसापूर, कोन्हाळी, मैंदर्गी ग्रामीण, मिरजगी, मुगळी, नागनहळ्ळी, नागोरे, संगोगी बसवण, उमरगे. बार्शी एकूण – अलीपूर, बळेवाडी, वडशिंगे, हिंगणी, काळेगाव, कासारवाडी, वव्हे, लक्ष्मीचीवाडी, मानेगाव, नागोबाची वाडी, पानगाव, रातंजण, सर्जापूर, सासुरे. दक्षिण सोलापूर – तीर्थ, धोत्री, मुस्ती, तांदूळवाडी.
तांत्रिक पद्धतीने होणार जमिनीचे संपादन
सूरत-चेन्नई ग्रीनफिल्डसाठी जमिनीचे संपादन वेगात करण्यात येणार आहे. सर्व जमिनीचे संपादन तांत्रिक पद्धतीने करण्यात येणार आहे. मोजणीसाठी रोअर मशीनचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी 50 लाख रुपयांचा निधीही दिला आहे. एका दिवसात 5 कि. मी. अंतर मोजणी पूर्ण होईल, असे नियोजन आहे. शिवाय राष्ट्रीय महामार्ग कंपनीचीही मदत घेण्यात येणार आहे. ऑगस्टपर्यंत अंतिम निवाडा पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर संपादनाची पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.




























































