कुंडलवाडी नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत भगवा फडकला, शिवसेनेच्या उमेदवार सुरेखा जिठ्ठावार विजयी

>> कुणाल पवारे, कुंडलवाडी

कुंडलवाडी नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार सुरेखा जिठ्ठावार यांनी भाजपच्या उमेदवार शेख रिहाना यांचा दणदणीत पराभव करत विजय मिळविला आहे. शिवसेनेच्या उमेदवार सुरेखा जिठ्ठावार यांना 10 तर भाजपच्या उमेदवारास 6 व एक उमेदवार तटस्थ राहिले आहेत. या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार सुरेखा जिठ्ठावार या विजयी झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांनी दिली.

कुंडलवाडी नगरपरिषदेच्या रिक्त झालेल्या नगराध्यक्ष पदासाठी 1 ऑक्टोबरला पोटनिवडणूक पार पडली. नगरपरिषदेतील 17 सदस्यांपैकी शिवसेना 3, काँग्रेस 4 व भाजप 10 असे पक्षीय बलाबल आहे. भाजपच्या ताब्यात असलेल्या नगरपरिषदेत गत साडेतीन वर्षापासून मनमानी व एकला चलोचा कारभार सुरू होता. काँग्रेसच्या उमेदवार अर्चना पोतनकर यांनी अरूणा कुडमुलवार यांना अपात्र करण्यासाठी उच्च न्यायालयापर्यत लढाई लढविली होती.

न्यायालयाच्या निकालानंतर राज्य शासनाने ही अरुणा कुडमुलवार यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याच्या कारणावरून नगराध्यक्ष पदावरून अपात्र केल्यावर नगराध्यक्ष पदाची 18 सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक जाहीर झाली होती. त्यावेळेसपासून राजकीय घडामोडींना वेग आला होता. या निवडणुकीत शिवसेना व काँग्रेस यांची महाविकास आघाडी झाली. त्यातच भाजपच्या सत्ताधारी मंडळीच्या कारभाराला कंटाळलेले भाजपचे 5 नगरसेवक महाविकास आघाडीत दाखल झाल्याने निवडणूक अधिकच रंगतदार झाली. त्यातच गेल्या 10 दिवसांपासून भाजपच्या सत्ताधारी मंडळीकडून नाराज नगरसेवकांचे मत परिवर्तन करण्यासाठी सर्वच पातळीवर प्रयत्न झाले. पण निकालांनतर मात्र या प्रयत्नांना अपयश आल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच भाजपने ह्या पोटनिवडणुकीला स्थगिती मिळावी यासाठी उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल केल्या होत्या. तीनही ठिकाणी याचिका फेटाळल्यानंतर भाजपची पंचाईत झाली होती.

1 ऑक्टोबर रोजी नगराध्यक्ष निवडीसाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे विशेष सभेचे आयोजन केले होते. यात नगरसेवकांनी ऑनलाईन मतदान केले. यात महाविकास आघाडी कडून शिवसेनेच्या उमेदवार सुरेखा जिठ्ठावार यांना 10 तर भाजपच्या उमेदवार शेख रिहाना यांना 6 मते मिळाली आणि एक नगरसेवक तटस्थ राहिले. यात शिवसेनेच्या उमेदवार सुरेखा जिठ्ठावार यांनी भाजपचे उमेदवार शेख रिहाना यांचा दणदणीत पराभव केला. जिल्ह्यात भाजपच्या ताब्यात असलेली एकमेव नगरपालिका ही हातातून गेल्याने भाजपला मात्र मोठा धक्का बसला आहे.

shivsena-kundalwadi

यापूर्वी ही 1996 मध्ये शिवसेनेकडून नरसिंग जिठ्ठावार यांनीही नगराध्यक्ष पद भूषवले. आता सुरेखा जिठ्ठावार यांच्या रूपाने जिठ्ठावार कुटुंबात दुसऱ्यांदा नगराध्यक्ष पद पक्षामुळे मिळाले आहे.

या पोटनिवडणुकीसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश मांटे, पोलीस उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी यांनी शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

आपली प्रतिक्रिया द्या