देवेंद्र फडणवीसांविरोधात याचिका करणाऱ्याला न्यायालयाने सुनावला 2 लाखांचा दंड

3728

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक याचिका दाखल करण्यात आली होती. सुरेश रंगारी यांनी ही याचिका दाखल केली होती. याच रंगारी यांना न्यायालयाने 2 लाखांचा दंड ठोठावला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून विजय मिळवला होता. निवडणुकीसाठीच्या प्रतिज्ञापत्रात फडणवीसांनी त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा रंगारी यांनी आरोप केला होता.

रंगारी यांनी दावा केला होता की वर्धा जिल्ह्यामध्ये फडणवीस यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयामध्ये रंगारी आपला दावा सिद्ध करू शकले नाहीत. रंगारी यांच्या आरोपामध्ये तथ्य न आढळल्याने न्यायालय संतापले होते. रंगारी यांनी ही याचिका समोरच्या व्यक्तीला त्रास देण्यासाठी आणि खोडसाळपणासाठी दाखल केल्याचं न्यायालयाने म्हटलं. न्यायालयाने रंगारी यांची याचिका निकाली काढत त्यांच्यावर न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याबद्दल 2 लाख रुपयांचा दंड ठोठावण्याचा आदेश दिला. ही रक्कम न भरल्यास रंगारी यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केला जाईल असेही न्यायालयाने म्हटले आहे.

रंगारी यांनी याचिकेद्वारे दावा केला होता की त्यांनी वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत 1 जानेवारी 2019 रोजी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर फडणवीस यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले होतं. ज्यामध्ये त्यांनी सावंगी मेघे पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात असलेल्या तक्रारीचा उल्लेख केलेला नाही. रंगारी यांनी न्यायालयाला सांगितलं होतं की त्यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे गुन्ह्याची माहिती लपवल्यासंदर्भात तक्रार केली होती. मात्र त्यांनी काहीच कारवाई न केल्याने उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.

आपली प्रतिक्रिया द्या