
>> सुरेश वांदिले
ग्रंथालयातील ग्रंथांना रात्री विश्रांती मिळायची. ग्रंथपाल आणि कर्मचारी घरी जाताना दिवे बंद करून जात. या अंधार आणि शांततेमुळे ग्रंथालयातलं वातावरण भयाण व्हायचं. याची भीती वाटून रहस्यमय विभागातील ग्रंथातील पात्रांना या भयाण वातावरणातून पळून जावंसं वाटे. भुताखेतांच्या, राक्षसांच्या ग्रंथांतील पात्रं भीतीने थरथर कापत. आपल्याला लेखकाने कशासाठी जन्मास घातले असेल, यावर डोकेफोड करत आपल्याला खलनायक म्हणून रंगवणारा लेखकच खरा खलनायक असल्याचं सगळय़ा पात्रांचं एकमत झालं. या शहरावर हल्ला करून लेखकांनाच नष्ट करायला हवं असं एकदोन पात्रांना वाटलं. “आपल्यासारख्या भित्रोबांना हल्ला करणं खरंच जमणार का?’’ एका वयस्क भुताने लक्षात आणून दिलं. “मग सगळ्यांनी बाजूच्या डोंगरातील धबधब्यात जाऊन उडय़ा मारू. त्यामुळे न रहेगा बास ना रहेगी बासुरी.’’ एकाने तर्कट चालवले.
“वेडय़ांनो, इथे अंधारात तुम्हाला इतकी भीती वाटते. धबधब्यावरून उडी मारायला हिंमत पाहिजे. ती आहे का?’’ एक वयस्क चेटकीण म्हणाली.
“जर आपला जन्मच भीती दाखवण्यासाठी झाला असताना आपल्याला का भीती वाटावी?’’ एका प्रेमळ भुताने प्रश्न विचारला.
भूत-चेटकीण-राक्षसांच्या ग्रंथदालनातील ग्रंथांतील पात्रांची ही दररोजची चर्चा इतर दालनांच्या ग्रंथांतील पात्रांच्या कानावर पडायची. भुताप्रेतांच्या ग्रंथांतील पात्रांना वेड लागल्याचं इतर ग्रंथांतील पात्रांना वाटू लागलं. भुताप्रेतांना नष्ट करण्याचा विचार युद्धकथा ग्रंथांतील पात्रं करू लागली. युद्धकथांच्या पात्रांतील सर्वात शूर पात्राला सेनापती केलं गेलं. त्याच्या नेतृत्वाखाली एके रात्री या पात्रांनी भूतप्रेत ग्रंथांतील पात्रांवर हल्ला चढवला. ते जरी बेसावध असले तरी क्षणात सावरले. त्यांच्याकडील अतिंद्रिय आणि जादुई शक्तीचा वापर करू लागले. त्यामुळे युद्धकथेतील आणि या भूतप्रेतांच्या पात्रांचं तुंबळ युद्ध सुरू झालं. युद्धकथेच्या पात्रांना वाटलं तसं काही चटदिशी भूतप्रेत पात्रांचा नायनाट झाला नाही.
युद्धाचा खणखणाट, कर्कश आवाज यामुळे जादूच्या ग्रंथांतील पात्रांना उत्साह आला. बाहेर पडून त्यांनी जादूने अनेक भुतांना पक्षी केले आणि युद्धकथेतील पात्रांना कोंबडे केले. एका जादूगार पात्राने मंत्र म्हणून आग ओकली. हे बघून देवदेवतांच्या कथांमधील काही पात्रं बाहेर आली. त्यांनी मंत्र म्हणून ग्रंथालयात नदी आणली. आग विझली, पण युद्धात सामील झालेली पात्रं वाहून जाऊ लागली. आता सगळ्याच दालनांतील ग्रंथांतील पात्रांचे धाबे दणादले. आपला शेवट लक्षात आल्याचे लक्षात आल्याने ते रडू लागले. पण एक चमत्कार घडला.
आतापर्यंत आपल्या प्रेमळ वागण्याने मिळवलेल्या शक्तीचा वापर करून प्रेमळ भुताने ग्रंथालयात शिरलेलं पाणी पिऊन टाकलं. शस्त्रं गिळली. भूतप्रेत, जादूगारांची जादू नष्ट केली. सगळय़ा पात्रांनी मान खाली घातली.
प्रेमळ भूत सगळय़ांना रागावले, “आपापसातील भांडणाने सर्वनाश होतो हे तुम्हीच या ग्रंथातून सांगता ना! मग कुठे गेला तो सुज्ञपणा? आपला जन्म मनुष्यप्राण्याला ज्ञान देण्यासाठी, आनंद देण्यासाठी, हुशार बनवण्यासाठी झालाय हे लक्षात ठेवा. आपणच असं अगोचरांसारखे वागलो तर या मनुष्यप्राण्यास रान मोकळं मिळेल. पुस्तकांमुळे पृथ्वीवर संस्कृती निर्माण झाली. मनुष्यप्राण्याचा मेंदू विध्वंसाकडे जास्त जातो. त्याला वाचवण्याचं, सावध करण्याचं आणि सावरण्याचं काम ग्रंथांनी केलं. आपण त्याच्यासारखं वागून सर्वनाश करून घ्यायचा नाही. मनुष्यप्राण्याचा नाश झाला तरी पुन्हा ग्रंथांमुळेच नवी संस्कृती जन्मास येऊ शकते हे लक्षात ठेवा.’’
प्रेमळ भुताने असं बरंच काही सांगितलं. काहींना पटलं, तर काहींना नाही. काहींना आजचं संकट टळल्याचा आनंद झाला. काही जण या आनंदात उद्या रात्री नव्या ऊर्जेने इतर पात्रांवर कसं तुटून पडायचं, या विचारात गुंग झाले. हे लक्षात आल्याने प्रेमळ भुताने कपाळावर हात मारून घेतला.