सरफराज, ऋतुराजला लंडनची लॉटरी; डब्ल्यूटीसी फायनलसाठी पाच राखीव खेळाडूंची निवड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आगामी जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यासाठी अजिंक्य रहाणेची झालेली निवड पाहून साऱयांनीच आनंद व्यक्त केला होता. आता आयपीएलमुळे खेळाडूंच्या दुखापतीत मोठय़ा प्रमाणात वाढ होत असल्यामुळे बीसीसीआयने 15 सदस्यांसह आणखी 5 राखीव खेळाडू पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात रणजी मोसमात दमदार कामगिरी करणाऱया सरफराज खान, ऋतुराज गायकवाडसह यष्टिरक्षक इशान किशन, तसेच नवदीप सैनी आणि मुकेश कुमार या वेगवान गोलंदाजांचीही निवड केली आहे. त्यामुळे पाच राखीव खेळाडू हिंदुस्थानच्या मुख्य संघासह डब्ल्यूटीसी फायनलला लंडनला जातील.

 हिंदुस्थानी संघात निवड झालेल्या 15 खेळाडूंपैकी चेतेश्वर पुजाराचा अपवाद वगळता तर उर्वरित 14 खेळाडू सध्या आयपीएल खेळत आहेत आणि या ताकदीच्या वेगवान खेळात खेळाडू मोठय़ा संख्येने जखमी होत आहेत. आतापर्यंत बुमराह, अय्यर, सुंदरसारखे अनेक खेळाडू दुखापतीमुळे आयपीएलबाहेर गेले आहेत आणि ते आगामी डब्ल्यूटीसी फायनलमध्येही दिसणार नाहीत. खेळाडूंच्या दुखापती पाहता ऐनवेळी नव्या खेळाडूची निवड करायला लागू नये म्हणून खबरदारी म्हणून बीसीसीआयने पाच राखीव खेळाडू निवडल्याचे सूत्रांकडून कळले आहे.

सरफराज आणि ऋतुराजला न्याय

गेल्या रणजी मोसमात 122.75 धावांच्या सरासरीने 982 धावा करूनही मुंबईकर सरफराज खानला हिंदुस्थानी संघात संधी मिळाली नव्हती. तसेच आयपीएलमध्ये जोरदार कामगिरी करणाऱया ऋतुराज गायकवाडला हिंदुस्थानी संघात अपेक्षित संधी मिळाली नाही. त्यामुळे डब्ल्यूटीसी फायनलच्या निमित्ताने या सर्वांना संघाबरोबर सराव करता यावा म्हणून त्यांना पाठवले जाणार आहे. या दौऱयात त्यांना अंतिम संघात खेळण्याची संधी मिळणे जवळजवळ अशक्यच आहे, पण एखादा खेळाडू दुर्दैवाने दुखापतग्रस्त झाला तर यापैकी एकाला खेळण्याची संधी मिळू शकते.