सरकारने सर्जिकल स्ट्राइकचा अतिप्रचार केला; निवृत्त लेफ्टनंट जनरल हुडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । चंदीगढ

सरकारने सर्जिकल स्ट्राइकचा अतिप्रचार केला. त्याचा अतिप्रचार करण्याची काहीही गरज नव्हती, असे मत निवृत्त लेफ्टनंट जनरल डी.एस. हुडा यांनी व्यक्त केले. हिंदुस्थानी सैन्याने 29 सप्टेंबर 2016 च्या रात्री सीमारेषा पार करून पाकव्याप्त कश्मीरमध्ये घूसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. सर्जिकल स्ट्राइकच्या या लष्करी मोहिमेला सरकारने अतिमहत्त्व दिल्याचे आपल्याला वाटते, असेही हुडा म्हणाले. पाकिस्तानविरोधात सर्जिकल स्ट्राइक गरजेचा होता. त्यामुळे आम्ही ही मोहीम हाती घेतली. आता या मोहिमेच्या मुद्द्याचे राजकारण करण्यात आले काय, हे योग्य किंवा अयोग्य, याला अतिमहत्त्व देण्यामागे राजकारण आहे काय हे प्रश्न राजकीय नेत्यांना विचारायला हवेत, असेही हुडा म्हणाले.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सध्याची परिस्थिती पाहता, पाकिस्तानला अप्रत्यक्षपणे पण त्यांच्यात भाषेत उत्तर देणे गरजेचे आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देणे आणि प्रोत्साहन देणे थांबवत नाही, तोपर्यंत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याची गरज आहे, असेही हुडा म्हणाले. हिंदुस्थानी सैन्याच्या अशा कारवायांमुळे पाकिस्तानकडून होणारी घुसखोरी थांबेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

निवृत्त लेफ्टनंट जनरल हुडा यांनी व्यक्त केलेले विचार त्यांचे वैयक्तीक मत असू शकते. त्यांच्या या मताबाबत प्रतिक्रिया देण्यास लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी नकार दिला. सर्जिकल स्ट्राइकसारख्या अनेक मोहीमांमध्ये हुडा यांची महत्वाची भूमिका आहे. त्यामुळे त्यांनी व्यक्त केलेल्या मताचा आपल्याला आदर असल्याचे रावत यांनी सांगितले. हिंदुस्थानी लष्कर 2015 पासून सर्जिकल स्ट्राइकची तयारी तयारी करत होते, असे माजी लष्करप्रमुख दलबीर सुहाग यांनी यावर्षी सांगितले होते. आता हिंदुस्थानी लष्कर दुसऱ्यांदाही सर्जिकल स्ट्राइक करू शकते. आपली पहिली मोहीम यशस्वी झाली आहे. त्यामुळे या पुढे आपण गरज असेल तेव्हा अशी मोहीम करू शकतो. आम्हाला आमच्या जवानांच्या क्षमता माहित आहोत. जवानांवर आमचा पूर्ण विश्वास आहे, असेही ते म्हणाले.

हुडा यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला आहे. जनरल हुडा हे खरे सैनिक आहेत. त्यांनी देशहितासाठी महत्त्वाचे मत व्यक्त केले आहे. राजकीय फायद्यासाठी आपल्या सैन्यातील जवानांच्या साहसाचा मिस्टर 36 यांनी गैरवापर केल्याचा आरोप त्यांनी केला. अनिल अंबानी यांनी 30 हजार कोटींचा फायदा होण्यासाठीच मोदी यांनी राफेल करार केला, असा आरोपही त्यांनी केला.