
कॉफी पिण्याची आवड बऱ्याच जणांना असते. काही जण तर चांगली कॉफी मिळणारी प्रसिद्ध ठिकाणे शोधून काढतात.काहीजण कॉफीचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटनस्थळे शोधतात, त्याठिकाणी निसर्गरम्य वातावरणात कॉफीचा चव घेतात. असे कॉफी शौकीनांची मनपसंद कॉफीसाठी कितीही पैसे खर्च करण्याची तयारी असते. मात्र,जगभरातील सर्वात महागडी कॉफी मांजर आणि हत्तीच्या विष्ठेपासून बनवली जाते, हे समजल्यावर कॉफी शौकिनांना आश्चर्य वाटेल.
‘चिवेट’ असे या मांजराच्या विष्ठेपासून जगातील महागडी कॉफी बनवण्यात येते. चिवेट मांजर कॉफीची फळे खातात. त्यांच्या आतड्यांमध्ये असलेली विशिष्ट प्रकारची एन्झाईम्स त्यावर प्रक्रिया करतात. त्यानंतर त्या कॉफीच्या बिया चिवेट मांजराच्या विष्ठेतून बाहेर पडतात. या मांजराच्या विष्ठेपासून कॉफी बनवण्याचे काम कर्नाटकातील कुर्ग येथे सुरू झाले आहे. चिवेट कॉफीला लुवार्क कॉफी असेही म्हणतात. कॉफी बनवण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीमुळे आणि त्यातील पोषक तत्त्वांमुळे ही कॉफी परदेशात 25 हजार रुपये प्रति किलोला विकली जाते.
कॉफी उत्पादक देशात हिंदुस्थान तिसऱ्या स्थानावर आहे. आता कर्नाटकने कूर्ग कॉन्सोलिटेड कमोडिटीज (सीसीसी)ने सुरुवातीला कमी प्रमाणात या कॉफीचे उत्पादन सुरू केले आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सीसीसीचे संस्थापक नरेंद्र हेबर यांनी सांगितले की, चिवेट कॉफीचे उत्पादन 2015-16 साली 60 किलो एवढे होते. तर 2017 साली 200 किलो एवढे झाले होते. सुरुवातीला आम्ही कमी प्रमाणात या कॉफीचे उत्पादन घेत आहोत.
हत्तीच्या विष्ठेपासूनही होते कॉफीची निर्मिती
हत्तींच्या विष्ठेपासूनही कॉफीची निर्मिती होते. थायलंडमध्ये तयार होणारी ही कॉफी हत्तीच्या विष्ठेत असणाऱ्या बिजापासून बनवली जाते. हत्ती कच्च्या शेंगा खातात त्याचे पचन होते. त्यातून हत्तीची जी विष्ठा बाहेर पडते. त्यातील बियांपासून कॉफी बनवली जाते. या कॉफीची किंमत 1100 डॉलर आहे.




























































