
सामना प्रतिनिधी, पालघर
सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून मीरा-भाईंदर, वसई-विरार पालिका तसेच 27 गावांची तहान भगवली जाणार आहे. यासाठी एमआयडीसी 403 एमएलडी क्षमतेची योजना राबवत असून युद्धपातळीवर जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र पाण्याच्या या ‘पळवापळवी’ला पालघरकरांनी विरोध केला आहे. आम्हाला प्यायला आणि शेतीला पाणी पूरत नसताना अन्य पालिकांना पुरवठा करताच कसा, असा सवाल करत शेतकऱ्यांनी जलवाहिनीचे काम बंद पाडले आहे. याप्रकरणी शेतकऱयांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याने सूर्या प्रकल्पाचे पाणी पेटणार आहे.
मीरा-भाईंदर, वसई-विरार महापालिका तसेच परिसरातील 27 गावांना वाढीव पाणीपुरवठा देण्यासाठी एमआयडीसीतर्फे 403 एमएलडी क्षमतेची योजना राबवली जात असून त्याचा ठेका एल ऍण्ड टी कंपनीला देण्यात आला आहे. नोव्हेंबर महिन्यात जलवाहिन्याच्या खोदकामास हालोली गावातून सुरुवात करण्यात आली. मात्र सूर्या प्रकल्पातून पाणी देण्यास विरोध करत पालघरमधील शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच ठिकठिकाणी आंदोलने केली. खडकोना, दुर्वेस गावात जलवाहिनीचे काम बंद पाडत ठेकेदाराला चांगला हिसका दाखवला होता. त्यावेळी मनोरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धवा जायभाये यांनी मध्यस्थी करत जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन तोडगा काढण्याबाबत सुचवले होते. यावर शेतकऱयांनी आपले आंदोलन मागे घेतले.
पाच जणांना अटक
जिल्हाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केल्यानंतर पुढील कामाला सुरुवात करू, असे आश्वासन दिले असतानाही एल ऍण्ड टी कंपनीने मनमानी करत पुन्हा दुर्वेस गावात जलवाहिनीसाठी खोदकाम सुरू केले. याची माहिती मिळताच संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत काम बंद पाडले. आधी आमची तहान भागू द्या, मग इतरांचे सांगा असे सुनावत ठेकेदाराला पिटाळले. याप्रकरणी शेतकरी अविनाश पाटील यांच्यासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
पाटाचे पाणी अडले कुठे?
सूर्या प्रकल्पातून पालघर तालुक्यातील शेती सिंचनाखाली आणण्याचा मुख्य उद्देश होता. यासाठी कालव्यांबरोबर पाटही खोदण्यात आले. परंतु पिण्यासाठी सोडाच शेतीलादेखील पाणी मिळेनासे झाले आहे. प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे पाटाचे पाणी प्रकल्पातच अडले असताना अन्य महापालिकांसाठी पाणी पळवण्याचा डाव असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

























































