सूर्यकुमारच्या षटकारात गुलाब दिसला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> द्वारकानाथ संझगिरी

सूर्यकुमारने पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा श्रीगणेशा लिहिला. त्यावेळी माझ्या अंगावरून मोरपीस फिरलं. कारण तो गोलंदाज इंग्लिश होता.

इंग्लंडबद्दल किंवा इंग्लिश माणसाबद्दल मला राग वगैरे काही नाही. ऐतिहासिक राग मी वर्तमानात आणत नाही किंवा काढतही नाही. पण एक जुनी गोष्ट आठवली, पूर्वी हिंदुस्थानी फलंदाजांना इंग्लिश टीकाकार ‘डल डॉग्स’ म्हणत. बरंचसं कुत्सितपणे. कारण हिंदुस्थानी फलंदाज कूर्मगतीने खेळत. त्यावेळी ते शब्द मला काटय़ासारखे टोचायचे. म्हणून मला सूर्यकुमारच्या षटकारात गुलाब दिसला. या मालिकेत हिंदुस्थानी संघाने गुलाबांचा ताटवा फुलवला.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2-1 पिछाडीवरून हिंदुस्थानी संघ जिंकला. तेसुद्धा टी-ट्वेंटीमधल्या जगातल्या सर्वात चॅम्पियन अशा संघाविरुद्ध. विजयाला कसलंही गालबोट लावायची हिंदुस्थानी संघाने कुणालाच संधी दिली नाही. खेळपट्टीला कुणी बोल लावू शकत नाही. पंचगिरीलाही नाही. उलट चौथ्या सामन्यात सूर्यकुमार बाद नसतानाही बाद दिला गेला. तिसरा पंच गांधारी झाला. किंवा मग माझ्या चष्म्याचा नंबर तरी बदलायची वेळ आली असं मला वाटलं. टॉसचं लकही हिंदुस्थानच्या बाजूला नव्हतं. सुरवातीला जो टॉस जिंकेल तो मॅच जिंकेल असं समीकरण होतं. हिंदुस्थानने ते ही बदललं आणि तेसुद्धा हिंदुस्थानी संघ 2 -1 असा बॅकफूटवर असताना. असं जिंकणं मला नेहमीच भावतं. हिंदुस्थानी संघाच्या विजयाची कारणमीमांसा कशी करता येईल?

हिंदुस्थानी फलंदाजीच्या खोलीला अंत नाही. ती अशी आहे की, एक, दोन फलंदाज अगदी मोठे फलंदाज अपयशी ठरले तरी हिंदुस्थानी संघाला फारसा फरक पडत नाही. वर रोहित शर्मापासून आणि खाली शार्दुल ठाकूरपर्यंत सर्व फलंदाज मोठे फटके मारू शकतात. मुख्य म्हणजे सेट व्हायला त्यांना एक, दोन चेंडू पुरतात. सूर्यकुमार तर मॅचसाठी हॉटेलमधून निघतो तेव्हाच सेट झालाय असं वाटतं. कारण त्याचा पहिला फटकासुद्धा बॅटच्या मध्यभागातून जन्म घेतो. आयपीएलमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल वाटणारा दबदबा आता कमी झालाय. आणि विशेषतः टी-ट्वेंटीमध्ये आयपीएल ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट ही आता सहा इंचाचीसुद्धा पायरी राहिलेली नाही. कसोटीत अजून रणजी ते कसोटी किंवा आयपीएल ते कसोटी यात सात, आठ पायऱयांचा तरी फरक आहे. सूर्यकुमार, किशनने तर एका घराच्या खोलीतून दुसऱया खोलीत प्रवेश करावा त्या सहजतेने आयपीएलमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला. त्यांना दबाव जाणवला नाही. त्यांच्या फलंदाजीचा दबाव इंग्लडला जाणवला.

किती फटके घेऊन ही दुक्कल अवतरली आहे. सूर्यकुमार तर एक पूल करतो मग कडकडीत बॅकफूटवर कव्हर ड्राइव्ह, मग एक्स्ट्रा कव्हरला इन साईड आऊट ड्राइव्ह, मग रिव्हर्स स्वीप, मग थेट सरळ सिक्स!, मैदान जर सूर्यफूल असेल तर सुर्यफुलाचे प्रत्येक पाकळीवर तो फटका मारू शकतो, असं वाटतं.

शेवटच्या निकराच्या सामन्यात हिंदुस्थानी फलंदाजी एखाद्या गुलमोहरप्रमाणे पूर्णपणे फुलली. रोहित एक कविता लिहून गेला. मोठय़ा कवीला काव्य उत्स्फूर्तपणे सुचतं, तसे फटके रोहित शर्माला उत्स्फूर्तपणे सुचताहेत असं वाटत होतं. एकामागून एक फटका येत होता. कधी पूल, कधी स्ट्रेट ड्राइव्ह, कधी कव्हर ड्राइव्ह, कधी ऑन ड्राइव्ह तर कधी आणखी कुठला. प्रतिभेचं मोठेपण हे होतं की, ज्या चेंडूंना थोपवण्यात इतरांना समाधान वाटलं असतं ना, त्या चेंडूंना रोहित पूल मारत होता. कधी फ्लिक करत होता, तर कधी ड्राइव्ह करत होता. एका चेंडूवर त्याला कवितेची पुढची ओळ सुचली, पण ती त्याच्याकडून नीट लिहून झाली नाही आणि त्याचं काव्य संपलं.

विराटने आघाडीला येऊन आणि आता पुढेही आघाडीला येणार हे सांगून एक चांगलं पाऊल उचललंय. एक तर आघाडीला आल्यामुळे संघातील सर्वोत्कृष्ट फलंदाजाला 20 षटकं खेळण्याची संधी मिळते. ती त्याला मिळते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिंदुस्थानची मधली फळी आता इतकी ताकदवान आहे की, विराट आघाडीला सहज येऊ शकतो आणि या सामन्यात तो शेवटपर्यंत राहिला तसा तो उभाही राहू शकतो. त्याच्या भोवती तरुण हिंदुस्थानी फलंदाजांची मधली फळी आता आतषबाजी करू शकते आणि शेवटी विराट स्फोट घडवून आणू शकतो. शेवटच्या टी-ट्वेंटीमध्ये तर तेच झालं. त्यामुळे मोठं टार्गेट इंग्लड पुढे ठेवता आलं.

इंग्लिश फलंदाजीही खोलवर पसरलेली आहे, पण कागदावर. मैदानावर त्यांच्या तीन, चार फलंदाजांनीच काँट्रीब्युशन केली. कारण त्यांच्या मधल्या फळीला हिंदुस्थानी वेगवान गोलंदाजांच्या चेंडूमधली विविधता ओळखता आली नाही आणि ओळखली तरी त्यावर मोठे फटके मारणे जमले नाहीत आणि ते बाद होत गेले. स्लोवर वन किंवा नकल बॉलवर हल्ला करण्यात ते बरेच कच्चे वाटले. शेवटच्या दोन सामन्यांत एका क्षणी आशादायक परिस्थिती असूनसुद्धा त्यांना सामने जिंकता आलेले नाहीत. त्यांना चेंडूमधली विविधता कळत नाही आणि स्लोवर वन किंवा नकल चेंडूवर हल्ला करता येत नाही, ही गोष्ट भुवनेश्वर कुमार आणि शार्दुल ठाकूर यांनी वारंवार दाखवून दिली.
हिंदुस्थानी संघाची सुस्थिती ही आता अर्जुनाच्या भात्यासारखी आहे. अगदी अक्षय. नव्या दर्जाच्या खेळाडूंनी तो भाता सदैव भरलेला असतो. त्यामुळे आता गांडीव धनुष्य उचलायचंय आणि टी-ट्वेंटीच्या वर्ल्ड कपचा वेध घ्यायचाय. सध्या तरी हिंदुस्थानी संघापुढे तोच पक्षाचा डोळा आहे.