
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तानाजी सावंतांना कुवतीपेक्षा जास्त दिले. त्यामुळे ते आज चालत चालत दीडशे कोटींचा कारखाना खरेदी करू शकतात. मात्र, बौद्धीक कुवत नसलेले हेच लोक आज शिवसेनेविरोधात बोलत आहेत. खोके घेऊन ओके झालेल्या अशा बोक्यांनाच ‘महाप्रबोधन यात्रे’द्वारे रोखणार असल्याचा इशारा शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिला आहे.
कुर्डुवाडी येथील गांधी चौकात रविवारी सायंकाळी शिवसेनेच्या ‘महाप्रबोधन यात्रे’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुषमा अंधारे बोलत होत्या. यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, संजना घाडी, डॉ. विलास मेहता, साईनाथ अभंगराव, जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, संभाजी शिंदे, नगराध्यक्ष समीर मुलाणी, शहरप्रमुख कुमार गव्हाणे, आशा टोणपे, राजाभाऊ गायकवाड, राजाभाऊ चवरे, फुलचंद धोका,
मनोज धायगुडे, शकील तांबोळी, दिलीप सोनवर, अरविंद पवार, हरीभाऊ बागल, मधुकर देशमुख, शुभांगी श्रीरामे, दमयंती सोनवर, सुधाकर लावंड, सचिन बागल, स्वप्नील गवळी, युसूफ दाळवाले, प्रभाकर गोरे, विशाल गोरे, हरीश भराटे, भारत कापरे, विजय श्रीरामे आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी उपनगराध्यक्ष जगन्नाथ जाधव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
सुषमा अंधारे म्हणाल्या, तानाजी सावंतांना सोलापूर जिह्याचे शिवसेना संपर्कप्रमुख केले होते. त्यांना यवतमाळमधून आपल्या जवळच्या भागात आणून निवडून आणले. कॅबिनेट मंत्री केले. तर दुसरा भाऊ शिवाजी यांनाही पद दिले होते. पण, महाराष्ट्राला भिकारी करीन, चालत चालत दीडशे कोटी रुपयांचा कारखाना घेतो, असे म्हणून तानाजी सावंत यांनी आपली बौद्धीक कुवत दाखवून दिली. खोके घेऊन ओके झालेल्या अशा बोक्यांनाच ‘महाप्रबोधन यात्रे’द्वारे रोखणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
भाजप मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी बहुतालभ्रमित करीत आहे. स्वतःला कीर्तनकार म्हणून घेणारे लोक अपशब्द वापरतात. सच्चा वारकरी अशा पद्धतीची भाषा वापरत नाही. मी भाजपविरोधात बोलत असल्यामुळे 13 वर्षांपूर्वीची क्लिप व्हायरल करून निषेध करतात. 13 वर्षे भाजपवाले झोपले होते का, असा सवालही त्यांनी केला. मी माझ्या शब्दावर ठाम असून, कुणाचीही माफी मागणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.