सुशांत सिंह प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे

1579

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची चौकशी आता सीबीआयकडून केली जाणार आहे. बिहार सरकारच्या शिफारशीनंतर केंद्र सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे दिले असल्याची माहिती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आज सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती ह्रषिकेश रॉय यांच्या खंडपीठाला दिली.

14 जून रोजी सुशांतचा मृतदेह गळफास घेतल्याच्या अवस्थेत त्याच्या राहत्या घरी आढळला होता. त्याने आत्महत्या का केली हे अद्याप गुपितच आहे. सुशांतच्या वडिलांनीही सीबीआय चौकशीची मागणी केली होती.

रिया चक्रवर्ती हिने सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करत सुशांतच्या वडिलांनी तिच्याविरुद्ध पाटणा येथे एफआयआर दाखल केला आहे. ते प्रकरण मुंबईला स्थानांतरित करण्यात यावे, अशी विनंती रियाने सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. सर्वोच्च न्यायालयात आज व्हिडीओ कॉन्फरसिंगने सुनावणी झाली.

यावेळी खंडपीठाने मुंबई पोलिसांना आतापर्यंतचा तपास अहवाल पुढील आठवडय़ात सादर करण्यास सांगितले. सीबीआयची मागणी हे राजकीय षड्यंत्र असल्याचे महाराष्ट्र सरकारचे वकील आर. बसंत म्हणाले.

मुंबई पोलीस उत्तम तपास करीत असून त्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणे योग्य नाही, असे महाराष्ट्र सरकारने सांगितले. पाटणा पोलिसांना एफआयआर दाखल करण्याचा आणि तपास करण्याचा कायदेशीर अधिकारच नसल्याचे सरकारी वकील आर. बसंत यांनी खंडपीठाला सांगितले.

मृत्यूचे कारण समजायलाच हवे

सुशांतसिंह हा एक उमदा कलावंत होता. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समोर यायलाच हवे, असे सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. खंडपीठाने मुंबई पोलिसांनाही खडे बोल सुनावले. गुन्ह्याच्या तपास कामात मुंबई पोलिसांचा नावलौकिक आहे. मात्र बिहारच्या पोलिसांना क्वारंटाइन केल्यामुळे समाजात चांगला संदेश जात नाही हे लक्षात ठेवा. सर्व काही कायद्यानुसारच होईल याची पोलिसांनी काळजी घ्यावी, असे खंडपीठ म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या