सुशील चंद्रा देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी सुशील चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज मंगळवारी ते पदभार स्वीकारणार आहेत. सध्या ते निवडणूक आयुक्तपदावर कार्यरत आहेत. सर्वात वरिष्ठ निवडणूक आयुक्तांना मुख्य निवडणूक आयुक्त बनवण्याच्या परंपरेनुसार सुशील चंद्रा याचे नाव या पदासाठी अगोदरच निश्चित मानले जात होते.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी चंद्रा यांची देशाचे 24 वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली. विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा निवृत्त होत असून त्यांच्याकडून सुशील चंद्रा या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. चंद्रा यांचा कार्यकाळ 14 मे 2022 पर्यंत असणार आहे.

14 फेब्रुवारी 2019 रोजी सुशील चंद्रा यांना निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यांच्या नेतृत्वात निवडणूक आयोग पुढील वर्षी उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर, उत्तराखंड या राज्यांमधील निवडणुका पार पाडणार आहे.