
नेपाळमध्ये झालेल्या हिंसक निदर्शनांनंतर निर्माण झालेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर, माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांना अंतरिम पंतप्रधान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रपती राम चंद्र पौडेल आणि लष्करप्रमुख जनरल अशोक राज सिंगडेल यांच्या उपस्थितीत Gen-Z गटांच्या बैठकीत सुशीला कार्की यांच्या नावावर एकमत झाले. त्या आज रात्री ८:४५ वाजता राष्ट्रपती भवनात शपथ घेतील. त्या नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान असतील, असं वृत्त ‘आज तक’ने दिलं आहे.
कोण आहेत सुशीला कार्की…
सुशीला कार्की यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून मास्टर्स केले. नेपाळच्या त्या पहिल्या महिला सरन्यायाधीश होत्या. जुलै 2016 ते जून 2017 या दरम्यान त्या या पदावर राहिल्या. न्यायपालिका लोकशाहीची राखणदार आहे, अशी त्यांची नेहमीच ठाम भूमिका राहिली. संसदेच्या कारभारात हस्तक्षेप केल्याचा आरोप ठेवून त्यांच्याविरुद्ध 2017 मध्ये महाभियोग आणण्यात आला होता.
दरम्यान, जेन झी आंदोलकांची बुधवारी व्हर्च्युअल बैठक झाली होती. या बैठकीत अंतरिम सरकारच्या प्रमुख म्हणून सुशीला कार्की यांनी जबाबदारी सांभाळावी, अशी विनंती करण्यात आली. त्यासाठी त्यांनी होकारही दिला होता.