
महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून अंमली पदार्थांचे (Drugs) मोठे साठे सापडण्याचे सत्र सुरूच आहे. अशातच सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा तब्बल साडेसहा हजार कोटी रुपयांचे ड्रग्स सापडल्याचा दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुष्मा अंधारे यांनी केला आहे. त्यांच्या या विधानाने पोलीस प्रशासन आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
‘गृहमंत्री खरंच कठोर पावले उचलणार का?’
सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘साताऱ्यात पुन्हा एकदा साडेसहा हजार कोटींचे ड्रग्स… गृहमंत्री खरंच कठोर पावले उचलणार की फक्त मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर महापौर पदाचा टप्पा गाठेपर्यंत दबावतंत्राचे राजकारण करणार?’ असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
सुषमा अंधारे यांच्या दाव्यानुसार, साताऱ्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांचे जाळे पसरले आहे. मात्र, प्रशासन यावर ठोस कारवाई करण्याऐवजी राजकीय समीकरणांमध्ये गुंतले आहे का, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर हे केवळ राजकीय दबावतंत्र असल्याचा आरोपही त्यांनी आपल्या पोस्टमधून केला आहे.

पोलीस प्रशासनाची भूमिका
इतक्या मोठ्या रक्कमेच्या अंमली पदार्थांबाबत अंधारे यांनी दावा केल्याने साताऱ्यातील स्थानिक पोलीस दल सतर्क झाले आहे. अद्याप अधिकृतरीत्या इतक्या मोठ्या साठ्याबाबत पोलिसांकडून दुजोरा मिळालेला नसला, तरी या आरोपांमुळे तपासाची चक्रे वेगवान होण्याची शक्यता आहे.
यापूर्वीही पुणे आणि साताऱ्याच्या काही भागात अंमली पदार्थांचे कारखाने आणि साठे उद्ध्वस्त करण्यात आले होते. आता या नवीन दाव्यामुळे राज्यातील ड्रग्स प्रकरणाला पुन्हा एकदा धार चढली आहे.
























































