
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साताऱ्यातील दरे गावाजवळील सावरी परिसरात 115 कोटी रुपयांचा ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला होता. या ठिकाणी ड्रग्जचा कारखानाच होता. धाड शेडवर नव्हे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ प्रकाश शिंदे यांच्या रिसॉर्टवर पडली होती. संबंधित लोक हे त्या रिसॉर्टमध्येच राहत होते. तिथेच ड्रग्जचा साठा आढळून आल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.
सातारा येथे पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या की, मुलुंड आणि वर्धा येथे धाड पडल्याची माहिती तत्काळ जाहीर झाली होती. पुण्यातून विशाल मोरे याला अटक झाल्याचेही कळाले होते. मात्र 115 कोटींच्या ड्रग्जसारख्या मोठय़ा प्रकरणात कोणतीही माहिती समोर येत नाही. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर खुलासा करणार का, असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला. प्रकाश शिंदे यांनी ही मालमत्ता विकल्याचा दावा केला आहे. मात्र त्यांनी दाखवलेली कागदपत्रे ही सर्व्हे नंबर 17 ची असून प्रत्यक्षात संबंधित मालमत्ता सर्व्हे नंबर 13 मधील असल्याचे अंधारे यांनी म्हणत प्रकाश शिंदे यांच्या दाव्यांमधली हवा काढली.
सुषमा अंधारेंकडून प्रश्नांची सरबत्ती
सातारा जिह्यातील कारवाईबाबत सुषमा अंधारे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. धाड टाकणारे पोलीस निरीक्षक आत्मजित सावंत सध्या कुठे आहेत?, त्यांच्या जिवाला काही धोका आहे का?, ते सुरक्षित आहेत का याबाबत कोणतीही अधिकृत माहिती का दिली जात नाही, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.



























































