सुषमा स्वराज यांचा युनोत सर्जिकल स्ट्राइक, पाकिस्तानचा खरा चेहरा दहशतवादाचा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
हिंदुस्थानच्या पराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आपल्या कारकीर्दीत हिंदुस्थानचा जागतिक स्तरावर दबदबा निर्माण केला.

सामना ऑनलाईन । संयुक्त राष्ट्रसंघ

संयुक्त राष्ट्रसंघाच्या 73 व्या आमसभेत हिंदुस्थानच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानवर शनिवारी ‘सर्जिकल स्ट्राइक’च चढवला. हिंदुस्थानविरोधात दहशतवादाचा ‘हत्यार’ म्हणून वापर करणे हे पाकिस्तानचे अधिकृत धोरणच असून दहशतवाद हाच त्या राष्ट्राचा खरा चेहरा आहे अशा शब्दांत स्वराज यांनी हल्लाबोल केला.

अमेरिकेवर 9/11 चा दहशतवादी हल्ला करणारा ओसामा बिन लादेन याचा खात्मा अमेरिकन सैन्याने पाकिस्तानात घुसून केला होता. पाकिस्तान दहशतवादी कारवाया करतो याचा यापेक्षा आणखी मोठा पुरावा कोणता असू शकतो, असा सवाल हिंदुस्थानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला.

लादेनचा खात्मा झाला असला तरी मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा ‘मास्टर माइंड’ हाफीज सईद हा आजही पाकिस्तानात उजळ माथ्याने फिरतो आहे. तिथे राजरोसपणे मोर्चे काढत, सभा घेत हिंदुस्थानला धमकावतो आहे असे सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रांना सांगितले.

दहशतवाद आजघडीला जगभरात प्रत्येक राष्ट्रात जाऊन पोहचला आहे असे सांगून त्या म्हणाल्या की, आमचा हिंदुस्थान गेली काही दशके दहशतवादाची झळ सोसत आहे. त्या दहशतवादी कारवाया शेजारचे राष्ट्र पाकिस्तानच करीत आला आहे. दहशतवादी कारवाया सुरूच ठेवायच्या आणि त्याचा इन्कारही करायचा असाच पाकिस्तानचा खाक्या आहे.

पाकिस्तानचा प्रचार खोटारडा
हिंदुस्थान चर्चेला तयार नाही असा आरोप करीत पाकिस्तान सतत खोटारडा प्रचार करीत असतो, पण वस्तुस्थिती अशी आहे की, हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात सुरू झालेली चर्चा दरवेळी पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांमुळेच बंद पडत आली आहे याकडे सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रांचे लक्ष वेधले. आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या शपथविधीच्या नंतर लगेचच ‘सार्क’ देशांना निमंत्रित करून चर्चा सुरू केली होती तर मी स्वतः इस्लामाबादला जाऊन चर्चेची सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर थोडय़ाच दिवसांत 2 जानेवारीला हिंदुस्थानच्या पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर दहशतवादी हल्ला करण्यात आला याची आठवण त्यांनी करून दिली.

आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या मुद्दय़ावरून 1996 सालात भरलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या एका अधिवेशनावेळीच हिंदुस्थानने या प्रश्नावर ठोस मसुदा तयार करावा असा प्रस्ताव मांडला होता. त्याबाबत आजवर काहीच झाले नाही. सदस्य राष्ट्रे या प्रश्नावर एकमुखाने आणि एकसुरात अजूनही बोलत नाहीत.

बुरहान वाणी याच्यासारख्या दहशतवाद्यांना ‘शहीद’ ठरवून पाकिस्तान त्यांची टपाल तिकिटे काढत त्यांना गौरवत आहे. याची गंभीर दखल संयुक्त राष्ट्रांनी आताच घेतली पाहिजे, अन्यथा भविष्यात आपल्याला मोठय़ा वणव्याला तोंड द्यावे लागेल.

हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात सुरू झालेली चर्चा दरवेळी पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांमुळेच बंद पडत आली आहे.

ज्यांच्या शोधासाठी ‘इनाम’ जाहीर झालेले आहे ते दहशतवादी ‘हीरो’ ठरत आहेत. त्यांना पैसा आणि हत्यारे पुरवली जात आहेत. त्यांना गौरवणारा देश उजळ माथ्याने संयुक्त राष्ट्रसंघात बसत आहे.