जळकोटमध्ये 50 भावी गुरुजींना कॉपी करताना पकडले, बीएड-एमएडच्या विद्यार्थ्यांवर कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडद्वारा सध्या बी.एड. व एम.एड.च्या परीक्षा घेण्यात येत आहेत. येथील संभाजीराव केंद्रे महाविद्यालयात असलेल्या परीक्षा केंद्रावर शिक्षण शास्त्र पदवी (बी.एड.) व शिक्षण शास्त्र पदव्युत्तर पदवी (एम.एड.) च्या 50 विद्यार्थ्यांना कॉपी करताना विद्यापीठाच्या भरारी पथकाने रंगेहाथ पकडले आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

भावी 50 गुरुजींना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या दक्षता (भरारी) पथकाने कॉपी करताना पकडल्याने केवळ दहावी – बारावीच नव्हे तर बी.एड. व एम.एड. च्या परीक्षेतही कॉपी होते, हे सिद्ध झाले आहे. या पकडलेल्या कॉपी बहाद्दरांविरुद्ध योग्य ती कार्यवाही करण्या संबंधीचा अहवाल दक्षता पथकाने विद्यापीठाकडे पाठविल्याची माहिती प्राप्त झाली आहे. एकाच वेळी 50 जणांविरुद्ध कार्यवाही प्रस्तावित केली असल्याने त्यांच्या भविष्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जळकोटच्या संभाजीराव केंद्रे महाविद्यालयात 24 डिसेंबर पासून बी.एड. व एम.एड. च्या नव्या व जुन्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असून सुमारे दोनशे परीक्षार्थी परीक्षा देत आहेत. त्यापैकी पन्नास पुरुष व महिला परीक्षार्थींना 27 डिसेंबर रोजी विद्यापीठाच्या दक्षता पथकाने अचानकपणे या परीक्षा केंद्रास भेट देऊन तपासणीद्वारे कॉपी करताना रंगेहाथ पकडले आहे. परीक्षार्थ्यांकडे कॉपीचे जे काही साहित्य आढळून आले त्या आधारावर कॉपीबहाद्दरांविरुध्द कार्यवाही करण्यात आली आहे. यात काही दोषी नसलेल्या विद्यार्थ्यांनाही पकडले असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे खरे काय खोटे काय याचा विद्यापीठाने छडा लावून निर्दोष विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

एकाच वेळी तब्बल 50 भावी गुरुजी परीक्षेत कॉपी करताना आढळल्याने शहर व तालुक्यात हा मोठ्या चर्चेचा विषय बनला आहे. या पकडलेल्या विद्यार्थ्यांपैकी काहीजणांना आपले भविष्य अंध:कारमय बनणार, शैक्षणिक नुकसान होणार या भितीने रडूही आवरता आला नाही. जळकोट मध्ये दोन बी.एड. कॉलेज असून एक एम.एड. कॉलेजही आहे. त्यांच्या परीक्षा याच केंद्रावर होतात. कॉपी बहाद्दरांविरुद्ध कार्यवाही झालीच पाहिजे. परीक्षा केंद्र कॉपी मुक्त झाले पाहिजे. पण हे करताना चोर सोडून संन्यास्याला फाशी होऊ नये, अशी अपेक्षा परीक्षार्थी व पालक वर्गातून व्यक्त होत आहे. या केंद्रावर केंद्र संचालक म्हणून प्रा.डॉ.व्ही.टी. कल्लूरकर हे काम पाहत आहेत. सहकेंद्र संचालक म्हणून प्रा.डॉ.सौ.ए.बी. सोमवंशी, प्रा.डॉ.एस.डी. मुंडे, प्रा.डॉ.बी.एस. राठोड हे काम पाहत आहेत.

दरम्यान यासंबंधी केंद्र संचालक प्रा.डॉ.व्ही.टी. कल्लूरकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी पन्नास विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. यापुढे कॉपी होणार नाही याची दक्षता घेऊ असेही ते म्हणाले. भावी गुरूजीच कॉपी करून पास झाले तर त्यांच्या हातून भावी पिढी कशी घडेल, अशीही चर्चाही या प्रकरणानंतर होताना दिसत आहे.