काँग्रेसचा ‘हात’ हाती घेतल्याने स्वाभिमानीच्या नाराज जिल्हाध्यक्षाचा राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

स्वाभिमाने शेतकरी संघटनेने या लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबत युती केल्याने नांदेड जिल्ह्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा आणि संघटनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले यांनी नांदेड जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा काँग्रेसला पाठिंबा असणार नाही, असे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्धीस दिले होते. भाऊराव चव्हाण सहकारी कारखान्याचे गैरव्यवहार, एफआरपी, आरएसएफची थकीत बाकी मिळावी, शेतकऱ्यांना ही थकबाकी लवकर देण्यात यावी या मागणीसाठी त्यांनी आपला लढा सुरुच ठेवला आहे. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय करुन त्यांच्याशी आघाडी केली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी हा घेतलेला हा निर्णय आम्हाला रुचलेला नाही. त्यामुळेच आम्ही या निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा देणार नाही, असा निर्णय जाहीर केला होता. रविवारी सायंकाळी त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आपण आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे कळविले आहे. त्यांनी हे पत्रक खासदार राजू शेट्टी यांना पाठवले आहे.

भाऊराव कारखान्याच्या विरोधात शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आपण न्यायालयीन लढाई सुरु केली आहे. यावेळी अनेक प्रकारचा दबाव, प्रलोभने आपणास दाखविण्यात आले. प्रसंगी माझ्या घरावर दगडफेकही झाली. मात्र आम्ही आमचा लढा सुरुच ठेवला. मात्र वरिष्ठांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याने आम्हाला हा निर्णय रुचला नाही त्यामुळे आपण या पदाचा राजीनामा देत असल्याचे प्रल्हाद इंगोले यांनी कळविले आहे.