योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्यावर ४० हून अधिक गुन्हे होते, शंकराचार्यांचे गंभीर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर अत्यंत गंभीर आणि बोचरी टीका केली आहे. एका जाहीर कार्यक्रमात बोलताना शंकराचार्यांनी मुख्यमंत्र्यांच्या जुन्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा पाढा वाचत थेट नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

शंकराचार्य म्हणाले आहेत की, योगी आदित्यनाथ जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले, तेव्हा त्यांच्यावर ४० पेक्षा जास्त फौजदारी खटले दाखल होते. ज्या व्यक्तीवर इतक्या मोठ्या प्रमाणात गुन्हे नोंदवलेले आहेत, ती व्यक्ती कायद्याचे राज्य आणि नैतिकतेच्या गप्पा कशा मारू शकते, असा रोकठोक सवाल त्यांनी विचारला. मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रशासकीय ताकदीचा वापर करून हे खटले मागे घेण्यात आले किंवा दडपले गेले, असा खळबळजनक दावाही त्यांनी यावेळी केला.

शंकराचार्यांच्या या विधानानंतर सोशल मीडियावर समर्थकांमध्ये आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. या आरोपांवर अद्याप मुख्यमंत्री कार्यालयाकडून किंवा भाजपकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.