‘स्विगी’मध्ये तीन लाख नोकऱ्यांची संधी!

1068

फूड डिलिव्हरी स्टार्टअप कंपनी स्विगी लवकरच देशातील सर्वाधिक नोकरी देणारी कंपनी बनू शकते. कंपनीने येत्या 18 महिन्यात 3 लाख डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हची भरती करणार आहे. यानंतर कंपनीची कर्मचाऱ्यांची संख्या ही 5 लाखाहून अधिक होणार आहे.

कंपनीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीहर्ष मजेटी हे कंपनीच्या वार्षिक बैठकीत म्हणाले की, ‘जर आमची अशीच प्रगती सुरू राहिली तर, तो दिवस दूर नाही जेव्हा आम्ही सैन्य आणि रेल्वेनंतर देशातील तिसर्‍या क्रमांकाचे रोजगार देणारे सर्वात मोठे स्रोत होऊ.’ सध्या हिंदुस्थानी सैन्यात 12.5 लाख सैनिक आहेत. रेल्वेत मार्च 2018 पर्यंत 12 लाख कर्मचारी काम करीत आहेत. तर खासगी आयटी कंपनी ‘टीसीएस’मध्ये साडेचार लाख कर्मचारी काम करीत आहेत. या तिन्ही कंपनी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी देतात. तर स्विगी डिलिव्हरी कर्मचार्‍यांना ‘ब्लू कॉलर जॉब’ (अनौपचारिक रोजगार क्षेत्र) अंतर्गत त्यांच्या कामाच्या आधारे पैसे दिले जातात.

आताच्या घडीला स्विगीमध्ये 2.1 लाख डिलिव्हरी कर्मचारी काम करीत आहे. तसेच 8 हजार कॉर्पोरेट कर्मचारी पेरोलवर काम करीत आहे. पेरोलवर नसल्यामुळे डिलिव्हरी कर्मचाऱ्यांना पीएफसारख्या सुविधा मिळत नाहीत. ‘ब्लू कॉलर जॉब’ देणाऱ्या कंपनीत स्विगीची प्रतिस्पर्धी कंपनी ‘झोमॅटो’ ही आहे. झोमॅटोत सध्या 2.3 लाख डिलिव्हरी कर्मचारी काम करीत आहे. ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टकडे 1 लाख डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह आहेत. अ‍ॅमेझॉनमधील कर्मचाऱ्यांची अधिकृत संख्या कळू शकलेली नाही. मात्र अ‍ॅमेझॉनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या हजारोंमध्ये आहे. अॅप-आधारित कॅब सर्व्हिस कंपनी ओला, उबरकडेही लाखो कर्मचारी कार्यरत आहेत.

मागील महिन्यात सरकारने एक मसुदा सादर केला आहे. ज्यामध्ये असंघटित क्षेत्रातील कर्मचार्‍यांना सामाजिक सुरक्षा देण्याचा प्रस्ताव आहे. स्विगीने अशा वेळी हे बंपर नोकरी भरती काढली आहे, जेव्हा कंपनीची वार्षिक उलाढाल ही 3.3 अब्ज डॉलर्सची झाली आहे. देशातील 500 शहरांमध्ये स्विगीचा विस्तार झाला आहे. त्यांना वर्षाला 50 कोटी ऑर्डर्स येत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या