खेळाडूंसाठी स्विमिंग पूल खुले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई – राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणाऱया खेळाडूंसाठी स्विमिंग पूल खुले करण्यात आले आहेत. त्यामुळे या खेळाडूंना आता सराव करता येणार आहे. 7 ऑक्टोबरपासून पुढील आदेश येईपर्यंत हा निर्णय लागू राहणार असल्याचे पालिकेने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. जलतरणाच्या विविध स्पर्धा पुढील काही दिवसांत होणार आहेत. मात्र मुंबईसह राज्यातील तरणतलाव खुली नसल्याने जलतरण खेळाडूंमध्ये नाराजी पसरली होती. त्यामुळे राज्य सरकारने विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱया जलतरण खेळाडूंना सरावाची सशर्त परवानगी दिली आहे. तरणतलावातील कर्मचाऱयांसह 18 वर्षांवरील खेळाडूंनी कोविड लसीचा दुसरा डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेले असणे बंधनकारक आहे, तर 18 वर्षांखालील खेळाडूंनी पालकांच्या संमतीपत्रासह वयाचा पुरावा सादर करणे गरजेचे आहे. नियमभंग झाल्यास साथरोग नियंत्रण कायद्यानुसार कारवाईचा इशारा पालिकेने दिला आहे.