
ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये शनिवारी एका शॉपिंग मॉलमध्ये एका माथेफिरूने अनेक लोकांवर चाकून सपासप वार केले. या हल्ल्यात अवघ्या नऊ महिन्यांच्या चिमुकल्यासह सहा जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. यानंतर हल्लेखोराला महिला पोलिसाने गोळ्या घालून ठार केले.
सिडनीच्या वेस्टफील्ड बॉन्डी जंक्शन मॉल येथे शनिवारी दुपारी ही धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर या मॉल रिकामा करण्यात आला. त्यानंतर मॉलला बंद केले आहे. संशयित हल्लेखोर स्थानिक वेळेनुसार दुपारी 3.10 वाजता (भारतीय वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता) मॉलमध्ये घुसला. यानंतर तो काही वेळ बाहेर गेला आणि नंतर दुपारी 3.20 वाजता परत आला आणि त्याने लोकांवर चाकूने सपासप वार करायला सुरुवात केली. यावेळी लोकांना गोळ्यांचा आवाजही ऐकू आला, असे सहाय्यक आयुक्त अँथनी कुक यांनी सांगितले.
ऑस्ट्रेलियाच्या पोलिसांनी या घटनेची माहिती पंतप्रधान एंथनी अल्बनीज यांना दिली आहे. या घटनेत दहशतवाद्यांचा हात आहे का, याचाही पोलीस तपास करत आहेत. या हल्ल्यात ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. आम्ही पोलिसांच्या धाडसाला सलाम करतो, असे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बनीज यांनी म्हटले आहे.
चाकू हल्ल्याने मॉलमध्ये पळापळ
मॉलमध्ये अनेक लोकांवर चाकू हल्ला करण्यात आल्यानंतर मॉलमध्ये लोकांची पळापळ सुरू झाली. लोक जिकडे जागा मिळेल तिकडे पळत होते. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. अनेक जण सुपरमार्पेटमध्ये लपून बसले. ते या ठिकाणी एक ते दोन तास लपून बसले. संपूर्ण परिसर पोलीस वाहनांच्या सायरने आणि
हेलिकॉप्टरच्या आवाजाने दणाणून गेला होता.
‘हल्लेखोर एकटाच मॉलमध्ये घुसला. त्याच्यासोबत अन्य कोणीही नव्हते. हल्लेखोराशी संबंधित कोणतीही माहिती सध्या समोर आलेली नाही. हल्ल्याचे कारणही सध्या समजू शकलेले नाही. या प्रकरणी पोलीस पथक तपास करत आहे, असे सिडनीचे पोलिस आयुक्त अँथनी कुक यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
























































