सीरियातील यादवीचे आक्रित!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद वि. प्रभू

सहा वर्षांपूर्वी अयलान कुर्दी नामक तीन वर्षांच्या चिमुकल्याचे शव तुर्कीच्या बोडरूभ या शहराच्या समुद्रकिनाऱयाला वाहून आलं होतं आणि पालथ्या पडलेल्या या मृत मुलाच्या प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांनी जगभर हळहळ आणि खळबळ माजली होती. सीरियामधील यादवी युद्धाचे तीव्र परिणाम जगाला खऱ्या अर्थाने उमजले होते. 23 सीरियन निर्वासितांना घेऊन एक छोटी नाव ग्रीसच्या कोरू बेटाकडे निघालेली असताना मध्येच ही नाव बुडाली आणि त्यामधील निर्वासितही बुडाले. त्यामध्ये हा चिमुकला होता. सीरियातील यादवी युद्धाला आता अकरा वर्षे पूर्ण झाली आहेत. अर्ध्यापेक्षा अधिक सीरिया उद्ध्वस्त झालेला आहे. युव्रेन-रशिया यांच्यातील युद्धाला केवळ चार महिने झालेत, तर युव्रेनचा बराचसा भूभाग बेचिराख झाला आहे. हे युद्ध सीरियाप्रमाणे अकरा वर्षे लांबले तर काय आक्रित होईल, याची कल्पना करा!

अमेरिका आणि तिच्या मित्रराष्ट्रांनी इराकचा हुकूमशहा सद्दाम हुसेन यांना यमलोकात पाठवल्यानंतर केवळ चारच वर्षांनी ‘अरब स्प्रिंग’ चळवळीचा अचानक उद्रेक झाला आणि मध्य-पूर्व आणि उत्तर आफ्रिकेतील अरब देशांमध्ये एकतर सत्तापालट झाला किंवा त्यांना या चळवळीचा फटका बसला. त्यापैकी सीरिया एक होता. उत्तर आफ्रिकेतील टय़ुनिशिया या छोटय़ा देशामध्ये भ्रष्टाचार, महागाई, हुकूमशाहीविरोधात एका फळविव्रेत्याने आत्मदहन केल्यानंतर या ‘अरब स्प्रिंग’ चळवळीचा प्रारंभ झाला आणि तिचा वणवा वेगाने फैलावला. ही चळवळ टय़ुनिशियानंतर लिबिया, इजिप्त, येमेन, बहारीन, सीरिया, मोरोक्को, इराक, अल्जेरिया, जॉर्डन, कुवेत, सुदान, ओमान, जिबोटी, मॉरिटानिया, सौदी अरेबिया वगैरे देशांमध्ये पसरली. यातील बऱयाच देशांनी बळाचा वापर करून किंवा सुधारणा करण्याची आश्वासने देऊन ही चळवळ शमवली, पण टय़ुनिशियाचे अध्यक्ष झैन अल अबिदिन बेन अली यांना हद्दपार करण्यात आले. लिबियातील नऊ महिन्यांच्या यादवी युद्धामध्ये हुकूमशहा मुअमर गद्दाफी ठार झाले. येमेनचे अध्यक्ष अली अब्दुल्ला सालेह यांना पदभ्रष्ट करण्यात आले. बहारीनने नागरी उठाव सौदी अरेबियाच्या मदतीने मोडून काढला, पण सीरियामध्ये अकरा वर्षे झाली तरी अजूनही यादवी युद्धाची धग जाणवतच आहे. सीरियाचे सर्वेसर्वा बशर अल असाद अजूनही सत्तेवर कायम आहेत. सीरियामध्ये अरब स्प्रिंग चळवळी अंतर्गत यादवी युद्धाचा प्रारंभ शाळकरी मुलांमुळे झाला, असे सांगितल्यास आश्चर्य वाटेल. सीरियाच्या डेरा शहरात 15 शाळकरी मुलांनी ‘ही राजवट उलथून टाकायची आहे’ असा संदेश शाळेच्या भिंतीवर रंगवून टाकला. या मुलांना अटक करून त्यांचा छळ करण्यात आल्यानंतर निदर्शनांना प्रारंभ झाला. आंदोलन चिरडण्यासाठी पोलीस बळाचा व नंतर लष्करी बळाचा अतिरेकी वापर झाला तर स्वसंरक्षणार्थ निदर्शकांनी शस्त्रे हाती घेतली आणि शेवटी त्याची परिणती यादवी युद्धात झाली.

सीरियातील यादवी युद्धामध्ये त्या देशाचे सर्वेसर्वा बशर अल असाद यांना रशिया, इराण आणि लेबनीज हेजबोलाह दहशतवादी संघटना यांचा पाठिंबा लाभलेला आहे, तर बंडखोरांना अमेरिका व सौदी अरेबियासारख्या तेलसंपन्न राष्ट्रांचा पाठिंबा आहे. कारण सरळ आहे. बशर अल असाद हे शियांमधील अलावी पंथाचे आहेत. त्यामुळे त्यांना शिया इराणचा पाठिंबा मिळाला, तर बंडखोरांमध्ये बरेच सुन्नी मुस्लिम आहेत. त्यांना सौदी अरेबियासारख्या सुन्नी बहुसंख्याक देशांचा पाठिंबा मिळाला. सीरियातील यादवी युद्धाच्या सुरुवातीलाच हिंसाचाराचा अवलंब केल्याचा ठपका बशर अल असाद यांच्यावर ठेवून अमेरिका, युरोपियन युनियन आणि बहुतेक अरब देशांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या युद्धाच्या प्रारंभी बंडखोरांची सरशी होताना आणि सरकारी फौजांची पीछेहाट होताना दिसत होती. राजधानी दमास्कसच्या काही उपनगरांमध्ये बंडखोरांच्या तुकडय़ा घुसल्या होत्या. बशर अल असाद यांची लिबियाच्या गद्दाफीसारखी स्थिती होणार अशी चिन्हे दिसत होती. दमास्कसमध्ये बशर अल असाद यांच्या हत्येचा अयशस्वी प्रयत्नही झाला, पण सरकारी फौजा असद यांच्याशी बऱयापैकी एकनिष्ठ होत्या. शिवाय रशियाचे सर्वेसर्वा ब्लादिमिर पुतीन यांनी आपले मित्र बशर अल असाद संकटात आहेत असे दिसल्यावर सीरियाला मोठय़ा प्रमाणात लष्करी मदत केली. सीरिया आणि रशिया यांची मैत्री हिंदुस्थान आणि रशियासारखीच आहे. आधीपासूनच सीरियामध्ये रशियाचा मोठा लष्करी तळ आहे. रशियन हवाई दलाने या यादवी युद्धात महत्त्वाची कामगिरी केली. त्याचप्रमाणे इराणनेही लष्करी मदतीव्यतिरिक्त अब्जावधी डॉलर्सची मदत सीरियाला दिली. त्यामुळे बशर अल असाद यांचे आसन यादवी युद्धाला अकरा वर्षे झाली तरी अजूनही टिकून आहे.

यादवी युद्धामुळे अर्ध्यापेक्षा जास्त सीरिया उद्ध्वस्त झाला आहे. या देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. महागाईमुळे 60 टक्के जनतेला उपासमारीचा धोका आहे. सीरियाची युद्धापूर्वी लोकसंख्या अडीच कोटी होती, त्यापैकी अर्धी लोकसंख्या युद्धामुळे विस्थापित झाली आहे. या यादवी युद्धात अंदाजे पाच लाख सीरियन नागरिक मृत्युमुखी पडले आहेत, तर वीस लाख सीरियन नागरिकांनी तात्पुरत्या छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. त्याचप्रमाणे 65 लाख सीरियन निर्वासितांना 128 देशांनी आश्रय दिला आहे. आता बशर अल असाद सरकारचे सीरियाच्या 70 टक्के भूभागावर नियंत्रण आहे. त्यामुळे अध्यक्ष असाद यांचे आसन बरेचसे स्थिर झाले आहे असे आता मानण्यात येत आहे, पण उत्तरेकडील तेलसंपन्न आणि खनिजसंपन्न असा काही भाग कुर्दिश बंडखोरांच्या ताब्यात आहे. 2022च्या मेमध्ये कुर्दिश बंडखोरांना रोखण्यासाठी तुर्कीने सीरियाच्या हद्दीमध्ये तीस किलोमीटरचा ‘सिक्युरिटी झोन’ तयार करण्याची घोषणा केली आहे. याला सीरिया आणि रशियाने विरोध केला आहे. ‘‘हा सीरियन सार्वभौमत्वावर हल्ला आहे असे आम्ही समजू’’ असे त्यांनी तुकाaला खडसावले आहे. विशेष म्हणजे हिंदुस्थाननेही या घटनेत सीरियाच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. कारण अलीकडे हिंदुस्थानने पाठवलेला गहू किडका आहे असे खोटे कारण सांगून तुर्कीने परत पाठवला होता. तुर्कीच्या या आडमुठेपणाला हिंदुस्थानने सीरियाच्या भूमिकेला पाठिंबा देऊन प्रत्युत्तर दिले आहे. सीरियाची काही सीमारेषा सीरियाला लागून आहे. गोलन टेकडय़ांवरून सीरिया आणि इस्रायलचा वाद आहे. त्याचप्रमाणे सीरियातील इराणी सैनिकी तळामुळे इस्रायल अस्वस्थ आहे. यादवी युद्धाच्या काळात बशर अल असाद यांनी आपल्या नियंत्रणाखालील भागात सार्वत्रिक निवडणुका घेऊन आपले आसन बळकट केले आहे. या वर्षी त्यांनी इराण आणि संयुक्त अरब अमिरातीचा दौराही केला, पण असाद यांच्यासमोर सीरिया पूर्वीसारखा एकसंध करण्यापासून ते अर्थव्यवस्था बळकट करण्यापर्यंत आव्हाने आहेत.

अपघाताने राजकारणात आलेले असाद!

प्राचीन सीरियावर सुमेरियन, बॅबिलोनियन यांच्यापासून ते ग्रीक, रोमन वगैरे अनेक साम्राज्यांनी राज्य केले. त्यानंतर अनेक घडामोडींतून 17 एप्रिल 1947 रोजी सीरिया स्वतंत्र झाला, पण खरे स्वातंत्र्य त्याला 1961 पासून मिळाले. 1963 पासून सीरिया अरब प्रजासत्ताकावर असाद घराण्याचे वर्चस्व असलेल्या बाथ पार्टीचे सरकार आहे. हाफिज अल असाद हे 1971 ते 2000 पर्यंत म्हणजेच 29 वर्षे सीरियाचे अध्यक्ष होते. हाफिज हे आपल्या पश्चात आपला मोठा मुलगा बासेल याच्याकडे सीरियाचे नेतृत्व सोपवणार होते, पण दमास्कसमध्ये झालेल्या एका मोटार अपघातात बासेलचा मृत्यू झाल्यानंतर हाफिज यांनी आपला धाकटा मुलगा बशर यांच्याकडे नेतृत्व सोपविण्याचा निर्णय घेतला. बशर अल असाद हे पेशाने डॉक्टर म्हणजेच नेत्ररोगतज्ञ आहेत. दमास्कसमध्ये शिक्षण घेऊन ते इंग्लंडमध्ये पुढील शिक्षणासाठी गेले असताना हाफिज यांनी त्यांना मायदेशी बोलावून घेतले. हिंदुस्थानच्या राजीव गांधी यांच्याप्रमाणेच बशर अल असाद यांना राजकारणात स्वारस्य नव्हते, पण इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर जसे राजीव गांधी यांना हिंदुस्थानचे नेतृत्व करावे लागले, तसेच हाफीज अल असाद यांच्या मृत्यूनंतर बशर अल असाद यांना सीरियाचे नेतृत्व स्वीकारावे लागले. गेली 21 वर्षे बशर अल असाद सीरियाचे अध्यक्ष आहेत. बशर यांना तीन मुले असून त्यांची पत्नी आसमा ही चैनीखोर म्हणून ओळखली जाते. तिला ‘रोझ ऑफ द डेझर्ट’ आणि ‘सीरियाची प्रिन्सेस डायना’ असे म्हटले जात असे. आता मात्र तिला ‘द फर्स्ट लेडी ऑफ हेल’ असे म्हटले जाते. बशर अल असाद यांचे दमास्कसमध्ये तीन आलिशान राजवाडे आहेत.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)