
म्हाडाच्या मुंबई मंडळाने नुकत्याच जाहीर झालेल्या 4082 सदनिकांच्या संगणकीय सोडतीतील विजेत्यांना प्रथम सूचना पत्र पाठविण्यापासून ते मुद्रांक शुल्क भरल्यानंतर ताबा पत्राची प्रत संबंधित कार्यकारी अभियंत्यांकडे पाठविण्यापर्यंतच्या सोडतपश्चात प्रक्रियाही यंदा प्रथमच ऑनलाइन केली आहे. विशेष म्हणजे, या प्रक्रियेत विजेत्यांना सर्व पत्र संबंधित अधिकाऱयांच्या डिजिटल स्वाक्षरीने दिली जात आहेत. पत्रावरील क्यूआर कोडमुळे या कागदपत्रांची सत्यता क्षणार्धात तपासता येणार आहे. त्यामुळे बनावट, खोटी कागदपत्रे बनविणाऱयांना चाप बसणार आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे 4,082 सदनिकांकरिता 14 ऑगस्ट रोजी संगणकीय सोडत IHLMS 2.0 या नवीन प्रणालीद्वारे काढली होती. अर्ज नोंदणीकरण व पात्रता निश्चितीनंतरच अर्जदार सोडत प्रक्रियेत सहभागी झाले. मंडळातर्फे सोडतपश्चात प्रक्रियाही ऑनलाइन करण्यात आली. विजेत्यांना प्रथम सूचना पत्र देणे, तात्पुरते देकार पत्र देणे, 25 टक्के रक्कम भरणा पत्र, गृहकर्जासाठी एनओसी देणे, मुद्रांक शुल्काचा भरणा करणे, ताबा पत्र देणे व त्याची प्रत संबंधित कार्यकारी अभियंता यांना पाठविणे या सर्व प्रक्रियादेखील ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विजेत्यांना घराच्या ताब्यासाठी वारंवार म्हाडा कार्यालयात चकरा मारण्याचा त्रास वाचला आहे.
150 विजेत्यांना ताबा पत्र
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीतील यशस्वी अर्जदारांपैकी सुमारे 550 अर्जदारांनी सदनिकेच्या विक्री किमतीचा 100 टक्के भरणा मंडळाकडे केला आहे. यामधील 150 पात्र अर्जदारांनी प्राप्त सदनिकेची 100 टक्के विक्री किंमत, मुद्रांक शुल्क भरणा करून दस्तऐवज नोंदणी केले आहेत व आगाऊ देखभाल खर्च भरला आहे, अशा अर्जदारांना ताबा पत्र देण्याची प्रक्रिया म्हाडाने सुरू केली आहे. मात्र काही अर्जदारांनी सदनिकेची रक्कम पूर्ण भरूनही अद्याप अधिवास प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, कलाकार असल्याचे प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यांच्या सदनिकेचा ताबा देण्याची प्रक्रिया प्रलंबित आहे.






















































