टी-20 वर्ल्ड कपवरही टांगती तलवार, कोरोना व्हायरसमुळे स्पर्धा आयोजनावर सावट

787

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रार्दूभावाचा फटका क्रीडा जगताला बसला असून त्यामुळे ऑलिम्पिक, ग्रॅण्डस्लॅम, युरो व कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांवरही याचे परिणाम होताना दिसत आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये या वर्षी 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत पुरूषांच्या टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात येणार आहे. मात्र ऑस्ट्रेलियातील लॉकडाऊनमुळे त्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

… तर स्पर्धा रद्द होऊ शकते
ऑस्ट्रेलियात या वर्षी होणारा टी-20 वर्ल्ड कप नियोजित वेळेनुसार खेळवण्यात आला नाही, तर ही प्रतिष्ठsची स्पर्धा रद्द होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कारण 2021 साली हिंदुस्थानात टी-20 वर्ल्ड कप आणि त्यानंतर 2023 सालामध्ये हिंदुस्थानातच वन डे वर्ल्ड कपचा थरार रंगणार आहे. अशा परिस्थितीत 2022 सालामध्ये ऑस्ट्रेलियातील टी-20 वर्ल्ड कप खेळवण्यात येऊ शकतो. प्रत्यक्षात तो केव्हा खेळवण्यात येईल हे पाहणे रंजक ठरणार आहे.

चार्टर फ्लाईटस्ने खेळाडूंना ऑस्ट्रेलियात आणा
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉग याने टी-20 वर्ल्ड कप ठरलेल्या वेळेनुसार खेळवण्यात यावा असे म्हटले आहे. यावेळी तो म्हणाला, स्पर्धेत सहभागी असलेल्या प्रत्येक देशांतील खेळाडूंना दीड महिने आधीच चार्टर फ्लाईटस्ने ऑस्ट्रेलियात आणायला हवे. त्यांची कोरोना चाचणी घेऊन दीड आठवडे एकांतवासात ठेवायला हवे. त्यानंतर पुन्हा त्यांची कोरोना चाचणी घेऊन त्यांना मैदानात उतरवायला हवे, असे ब्रॅड हॉग पुढे म्हणाला.

प्रेक्षकांविना स्पर्धा खेळवण्याचा विचारही करू शकत नाही
ऑस्ट्रेलियातील टी-20 वर्ल्ड कपमधील लढती प्रेक्षकांविना खेळवण्याचा विचार क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून होत आहे. पण या पर्यायाला ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ऍलन बॉर्डर यांनी विरोध दर्शवला आहे. टी-20 वर्ल्ड कपसारख्या मोठया स्पर्धेतील लढती प्रेक्षकांविना खेळवण्याचा विचारही करू शकत नाही. कोरोनाचे सावट असेपर्यत ही स्पर्धा खेळवू नका. तोपर्यंत ही स्पर्धा पुढे ढकला. अन्यथा इतरत्र खेळवा, असे ते पुढे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या