
ज्या क्षणाची मुंबईकर गेली सहा वर्षे वाट पाहत होते, अखेर त्यांची प्रतीक्षा संपली. बहुप्रतिक्षित टी-20 मुंबई लीगचा धमाका क्रिकेटप्रेमींना बुधवारपासून अनुभवता येईल. डी. वाय. पाटील स्टेडियम आणि वानखेडे स्टेडियमवर हा अस्सल मुंबईकर क्रिकेटमेळा सुरू होत असून यात स्टार खेळाडू असलेल्या आठ बलाढ्य संघांचा समावेश करण्यात आला आहे. 4 ते 12 जूनदरम्यान नऊ दिवसांत 23 रोमांचक आणि उच्च दर्जाच्या क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे.
2018 मध्ये सुरू झालेली टी-20 मुंबई लीग, जी हिंदुस्थानातील आघाडीच्या फ्रेंचायझी-आधारित देशांतर्गत टी-20 स्पर्धांपैकी एक आहे. ती अनेक उदयोन्मुख स्टार खेळाडूंसाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरली आहे, ज्यात शिवम दुबे, तुषार देशपांडे आणि शम्स मुलानी यांचा समावेश आहे. सहा वर्षांनंतर भव्य पुनरागमन करत असलेल्या या लीगमध्ये सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, शिवम दुबे आणि पृथ्वी शॉसारख्या आंतरराष्ट्रीय स्टार खेळाडूंची फटकेबाजी पाहता येईल. एवढेच नव्हे तर मुशीर खान, अंगक्रिष रघुवंशी आणि अथर्व अंकोलेकरसारख्या तेजस्वी तरुण खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे.